BJP Leader Devendra Fadnavis | (Photo Credits: IANS)

Sanjay Raut and Devendra Fadnavis Meeting: शनिवारी शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) आणि माजी मुख्यमंत्री तथा भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यामध्ये गुप्त बैठक झाली. या बैठकीची राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली होती. परंतु, आता देवेंद्र फडणवीस यांनी या बैठकीसंदर्भात स्पष्टोक्ती दिली आहे. संजय राऊत यांच्यासोबत झालेल्या बैठकीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे. संजय राऊत यांना सामना वृत्तपत्रासाठी माझी मुलाखत घ्यायची होती. त्यानंतर मी बैठकीसाठी काही अटी झालून दिल्या होत्या. त्यानुसार, या बैठकीत चर्चा झाली. यात कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही, असं स्पष्टीकरण देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे.

दरम्यान, संजय राऊत यांनीदेखील या बैठकीविषयी आज खुलासा केला आहे. देवेंद्र फडणवीस सध्या राज्याचे विरोधी पक्षनेते आहेत. ते माजी मुख्यमंत्रीही आहेत. तसेच भाजपाने त्यांच्यावर बिहार निवडणुकीची जबाबदारी सोपवली आहे. आमच्यात वैचारिक मतभेद असू शकतात पण आम्ही शत्रू नाही. फडणवीस यांची भेट ही गुप्त स्वरुपीची नव्हती. आमच्या या भेटीची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कल्पना आहे, असंही संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे. (हेही वाचा - Sanjay Raut on Devendra Fadnavis Meet: 'आमच्यामध्ये वैचारिक मतभेद असले तरी आम्ही शत्रू नाही'; देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर संजय राऊत यांचे वक्तव्य)

संजय राऊत तसेच देवेंद्र फडणवीस यांनी या बैठकीनंतर आपआपल्या बाजू स्पष्ट केल्या आहेत. मात्र, तरीदेखील या बैठकीवर राजकीय वर्तुळातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याचा कोणताही प्रयत्न नाही. राजकीय मतभेद असले तरी, आमच्यात वैमनस्य नसल्याचं, भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे.

संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात शनिवारी मुंबईतील हयात हॉटेलमध्ये झालेल्या भेटीवर काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी राऊत यांच्यावर नाव न घेता टीका केली आहे. शिवसेनेच्या कंपाऊंडरला हेडलाइनमध्ये राहण्याची मोठी भूक लागली आहे, अशी अप्रत्यक्ष टीका निरुपम यांनी केली आहे.