Maharashtra Politics: विधानसभा निवडणुकीतील (Assembly Elections 2024) महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi) अपयशानंतर आघाडीत मोठी फुट पडण्याची शक्यता आहे. येत्या दोन ते तीन महिन्यांत महाराष्ट्र काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गटातील (Uddhav Thackeray Group) काही मोठे नेते शिंदे गटात (Shinde Group) सामील होणार आहेत, असा दावा राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी केला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे 4 आमदार, 3 खासदार आणि 5 काँग्रेस आमदार लवकरच शिवसेना शिंदे गटात सामील होतील. याचा पहिला टप्पा उद्या पूर्ण होईल, असं उदय सामंत यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, उदय सामंत यांनी आमदार आणि खासदारांची नावे उघड केली नाहीत. उदय सामंत यांनी यासंदर्भात बोलताना सांगितले की, 'मी आधी सांगितले होते की, ठाकरे गटात उद्यापासून फुट पडायला सुरुवात होईल. उद्या तुम्हाला त्याचा पहिला ट्रेलर पाहता येईल. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली 4 आमदार, 3 खासदार, 5 काँग्रेस आमदार आणि असंख्य जिल्हाप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत सामील होतील. यातील पहिले पाऊल म्हणून, पहिला पक्ष प्रवेश उद्या रत्नागिरीत होईल. तसेच दुसऱ्या टप्प्यात, विद्यमान आमदार आणि खासदार एनडीएमध्ये सामील होतील,' असंही उदय सामंत यांनी म्हटलं आहे. (हेही वाचा -Uday Samant Statement: राज्य सरकार उद्योगांबाबत श्वेतपत्रिका काढणार, उद्योगमंत्री उदय सामंतांची घोषणा)
ऑपरेशन धनुष -
उदय सामंत यांनी सांगितले की, ऑपरेशन धनुष अंतर्गत उद्यापासून मोठ्या नेत्यांच्या किंवा माजी आमदारांच्या, माजी खासदारांच्या समर्थकांची प्रवेश प्रक्रिया सुरू होईल. दुसऱ्या टप्प्यात, विद्यमान आमदार आणि खासदार एनडीएमध्ये सामील होतील. उद्या, त्यांच्या प्रवेशाबाबतच्या तांत्रिक मुद्द्यांवरही अमित शहांसोबत चर्चा केली जाईल. आम्ही कोणत्याही पक्षात व्यत्यय आणत नाही आहोत. एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून विद्यमान खासदार आणि आमदार आमच्यात सामील होऊ इच्छितात, असंही उदय सामंत यांनी यावेळी स्पष्ट केलं. (हेही वाचा - Uday Samant On Eknath Shinde: एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री झाले नाहीत तर आम्ही मंत्रीपद स्वीकारणार नाही; उदय सामंत यांची भूमिका)
राहुल शेवाळे यांनी केला मोठा दावा -
यापूर्वी, शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि माजी खासदार राहुल शेवाळे यांनी देखील दावा केला होता की, येत्या काळात उद्धव ठाकरे शिवसेना आणि काँग्रेसचे काही आमदार आणि खासदार एनडीएमध्ये सामील होणार आहेत. या संदर्भात महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा सुरू असल्याचे शेवाळे यांनी म्हटलं आहे.