व्यापारी मनसुख हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणी (Mansukh Hiren Death Case) संशयाच्या भोवऱ्यात अडकलेले पोलिस अधिकारी सचिन वाझे (Sachin Vaze) गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहेत. आता त्यांच्या खळबळजनक व्हॉट्सअॅप स्टेटसने (WhatsApp Status) सर्वांचे लक्ष वेधले आहे. सचिन वाझे यांनी व्हॉट्सअॅप स्टेटसच्या माध्यमातून आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येते. तर मेसेजमधील शेवटची ओळ धक्कादायक आहे. 'आता जगाला गुडबाय म्हणायची वेळ जवळ आली आहे', असे त्यांनी व्हॉट्सअॅप स्टेटसद्वारे म्हटले आहे.
सचिन वाझे यांनी आपल्या व्हॉट्सअॅप स्टेटसमध्ये लिहिले, "3 मार्च 2004 मध्ये काही सीआयडी अधिकाऱ्यांनी मला खोट्या केसमध्ये अटक केली. त्या प्रकरणात आतापर्यंत काहीच निष्पन्न झाले नाही. पण आता इतिहासाची पुनरावृत्ती होताना दिसत आहे. माझे सहकारी अधिकारी पुन्हा मला खोट्या प्रकरणात अटकवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण यावेळेस परिस्थितीत काहीसा फरक आहे. 17 वर्ष माझ्याकडे आशा, संयम, आयुष्य आणि नोकरीही होती. पण आता माझ्याकडे 17 वर्षांचे आयुष्य, नोकरी आणि संयम नाही. मला असे वाटते, आता जगाला गुडबाय म्हणायची वेळ जवळ आली आहे." (Mansukh Hiren Death Case: सचिन वाझे यांच्याकडून ठाणे कोर्टात अटकपूर्व जामिन अर्ज दाखल)
मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण नेमकं काय?
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील अँटिलिया या निवासस्थानाजवळ 25 फेब्रुवारी रोजी एक स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ आढळली. त्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरु झाला. तेव्हा ही कार ठाण्यातील व्यापारी मनसुख हिरेन यांच्या मालकीची असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर मुंबई क्राईम ब्रांच टीमकडून हिरेन यांची चौकशी सुरु झाली. यात टीममध्ये सचिन वाझे देखील होते. मात्र काही दिवसांतच मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू झाला. 5 मार्च रोजी मुंब्रा येथील खाडीत त्यांचा मृतदेह आढळला. त्यानंतर हिरेन यांच्या कुटुंबियांसह विरोधकांनी सचिन वाझे यांच्यावर गंभीर आरोप केले आणि प्रकरणाला वेगळे वळण लागले.
सचिन वाझे यांच्या निलंबनाची आणि अटकेची मागणी विरोधकांकडून जोर धरु लागली. तसंच या प्रकरणाचा तपास NIA कडे सोपवण्यात यावा, अशीही मागणी विरोधक करु लागले. मात्र महाराष्ट्र पोलिस सक्षम असल्याचे सांगत या प्रकरणाचा तपास ATS कडे सोपवण्यात आला. तर मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकं सापडल्या प्रकरणाचा तपास NIA करत आहे. दरम्यान, विरोधकांच्या आक्रमक पवित्र्यानंतर सचिन वाझे यांची क्राईम ब्राँचमधून नागरी सुविधा केंद्रात बदली करण्यात आली आहे. विशेष म्हणजे सचिन वाझे यांची ATS कडून कसून चौकशी झाल्यानंतर त्यांनी ठाणे कोर्टात अटकपूर्व जामिन अर्ज दाखल केला आहे.