अभिनेत्री मानसी नाईक चा विनयभंग करणाऱ्या एकाला अटक; दोघांना अटकपूर्व जामीन मंजूर
Manasi Naik Molestor Arrested (Photo Credits : Instagram)

पुणे (Pune ) येथील युवासेना (Yuvasena) अध्यक्षांच्या वाढदिवस कार्यक्रमात परफॉर्म करणाऱ्या अभिनेत्री मानसी नाईक (Manasi Naik) हिचा काही अज्ञात तरुणांकडून विनयभंग करण्यात आला होता, या प्रकरणी मानसीने केलेल्या तक्रारीनंतर आता यातील एकाला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. स्वारगेट (Swargate) भागात पोलिसांनी या तरुणाला अटक केले असून त्याचे नाव अजय कल्याणकर (Ajay Kalyankar) असे आहे. अजय हा साऊंड असिस्टंट म्ह्णून कार्यक्रमात काम करत होता. तर अन्य दोघांना अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे. शिरुर तालुक्यातील रांजणगाव येथे हा प्रकार घडल्याचा आरोप मानसीने केला होता, याबाबत तिने सुरुवातील साकीनाका पोलिसांकडे तक्रार नोंदवली होती त्यानंतर हे प्रकरण रांजणगाव पोलिसांकडे सोपवण्यात आले होते. मानसी नाईक हिच्या छेडछाडी प्रकरणात आता आरोपी अजय याला शिरुर न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

प्राप्त माहितीनुसार, पुण्याचे युवासेना जिल्हा प्रमुख यांचा 5 फेब्रुवारी रोजी वाढदिवस होता यात मानसी परफॉर्म करत होती. या तरुणांनी तिची छेड काढून तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला तसेच तिला धमकावत शांत राहण्यास सांगितले. याबाबत मानसीने मुंबईत परतताच साकीनाका पोलिसात तक्रार नोंदवली आहे. याप्रकरणी तीन जणांविरोधात कलम 354 आणि 506 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त अंकित गोयल यांनी दिली होती.

दरम्यान, याप्रकरणी मानसीने माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत मी महाराष्ट्राची मुलगी आहे कोणालाही घाबरणार नाही आणि क्षणात तर मुळीच बसणार नाही असे म्हंटले होते. या पूर्वी सुद्धा अनेक अभिनेत्री अशाच प्रकारच्या प्रसंगाला सामोरे गेल्या आहेत, कित्येकदा फॅन्सच्या रूपात येऊनही अनेकजण गैरव्यवहार करतात अशीही तक्रार अनेकदा समोर आली आहे.