मुस्लिम व्यक्तीकडून किराणा सामानाची डिलिव्हरी घेण्यास नकार देणाऱ्या एका 51 वर्षीय व्यक्तीला मुंबईतून अटक करण्यात आली आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, ऑनलाईन ऑर्डर केलेल्या किराणा सामनाची डिलिव्हरी करण्यास आलेल्या एका 32 वर्षीय व्यक्तीकडून पार्सल घेण्यास या व्यक्तीने नकार दिला. ही घटना मुंबईतील (Mumbai) मीरारोड (Miraroad) येथून समोर येत आहे. डिलिव्हरी घेऊन आलेल्या व्यक्तीला नाव विचारण्यात आले आणि त्यानंतर त्यांनी डिलिव्हरी घेण्यास नकार दिला. यावर आश्चर्यचकीत झालेल्या डिलिव्हरी बॉयने पुढील संभाषण मोबाईलमध्ये रेकॉर्ड केले. या घटनेबद्दल डिलिव्हरी बॉयने त्याच्या कुटुंबियांना सांगितले असता त्यांनी पोलिसात तक्रार करण्याचा सल्ला दिला.
याबद्दल बोलताना सामान डिलिव्हर करणाऱ्या व्यक्तीने सांगितले की, "कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर मी बाहेर पडत असल्याने माझ्या मुलांसह कुटुंबिय चिंतेत असतात. तसंच मुंबई हे कोरोनाचे मुख्य हॉटस्पॉट आहे. त्यामुळे काळजी अधिकच वाढते. मात्र संपूर्ण देश कोरोना व्हायरस संकटाशी झुंजत असताना काहीजण अजूनही धर्मांच्या बंधनात अडकले आहेत." (मुंबई: तबलिगींविरोधात अफवा पसरवल्याप्रकरणी धारावी परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीवर गुन्हा दाखल)
अशा प्रकारची ही पहिलीच घटना नसून यापूर्वी अशा अनेक घटना समोर आल्या आहेत. गेल्या वर्षी एका हिंदू नसलेल्या व्यक्तीकडून ऑर्डर नाकारल्याचे एका व्यक्तीने ट्विटरवर लिहिले होते. तसंच मला रिफंडही नको असे त्याचे म्हणणे होते. तो डिलिव्हरी बॉय झोमॅटो कंपनीचा असल्यानेअन्नाला धर्म नसतो असे उत्तर झोमॅटो कडून देण्यात आले होते.