Tourism Banned In Malshej Ghat Till 31st July (Photo Credits: Instagram)

पावसाळी सहलीचा प्लॅन आखताना माळशेज घाटाचे (Malshej Ghat) नाव दरवर्षीच निसर्गप्रेमींच्या यादीत पहिल्या स्थानी असते. मात्र मागील काही दिवसात वारंवार दरड कोसळत असल्याच्या घटनांनी पर्यटकांच्या सुरक्षेवर प्रश्न उभे राहिले आहे. दरड कोसळून होणारे अपघात टाळण्यासाठी माळशेज घाटात येणाऱ्या पर्यटकांना 31 जुलैपर्यंत घाटात पर्यटनबंदी करण्यात आली आहे.'मटा'च्या वृत्तानुसार याबाबत ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी लेखी आदेश लागू केले आहेत. माळशेज घाटात दरडी पडण्याचे प्रकार तसेच यापूर्वी घडलेल्या दुर्घटनांच्या अनुषंगाने हा निर्णय घेण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.

पावसाळ्यामध्ये मुंबईसह पुणे, नगर, नाशिक भागातून हजारो पर्यटक माळशेज घाटात गर्दी करत असतात. त्यानुसार माळशेज घाटातील चार धबधबे तसेच पर्यटन विभागाने विकसित केलेले दोन पॉइंट या ठिकाणांवर पोलिसांचे खास लक्ष असणार आहे. सहायक पोलिस निरीक्षक सुहास खरमाटे यांच्या माहितीनुसार माळशेज घाटातील काही तलाव तसेच लेण्यांजवळ जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. यात माळशेज घाट, गणेश लेणी, पडाळे डॅम, सिद्धगड या ठिकाणांचा समावेश आहे. (हे ही वाचा -यंदाच्या पावसाळयात निसर्गाच्या कुशीत नेणाऱ्या 'या' पाच सोप्प्या ट्रेक ना आवर्जून भेट द्या)

दरम्यान, माळशेज घाटातून वाहतूक सुरू असेल . मात्र, पर्यटकांना कोठेही थांबता येणार नाही. येत्या शनिवार, रविवार तसेच लागून येणाऱ्या सुट्ट्यांच्या दिवशी माळशेज घाटात दोन पोलिस अधिकाऱ्यांसह 35 पोलिस कर्मचाऱ्यांचा कडक बंदोबस्त असणार आहे. तसेच इतर दिवशी घाटमार्गावर पोलिस गस्त घालण्यात येणार आहे. बेताल वर्तन करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. त्यांच्यावर कठोर कारावाई करण्यात येणार आहे.