Khandoba Yatra | (File Image)

महाराष्ट्रात सध्या हलाल मटणाविरूद्ध झटका मांस असा नवा वाद सुरू झाला आहे. 100% हिंदू खाटिकांकडून मांस विक्रीसाठी राज्याच्या मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी झटका मांसला ‘मल्हार सर्टिफिकेशन’ (Malhar Certification)  नाव देण्याची घोषणा काही दिवसांपूर्वी केली आहे. पण आता यामध्ये 'मल्हार' या नावावरून वाद निर्माण झाला आहे. जेजुरीच्या खंडोबा देवस्थानच्या विश्वस्तांमध्ये या निर्णयावरून मतभेद झाले आहेत.विश्वस्त डॉ .राजेंद्र बबनराव खेडेकर (Trustee of Khandoba Devasthan, Jejuri Dr. Rajendra Babanrao Khedekar) यांनी 'मल्हार' या नावावर आक्षेप घेत नावात बदल करण्यासाठी मंत्री नितेश राणे यांना पत्र दिले आहे. (हेही वाचा, 'Malhar' Certification For Hindu-run Mutton Shops: 100% हिंदू खाटीकांकडून मांस विक्रीसाठी राज्य सरकारकडून 'मल्हार सर्टिफिकेशन'; पहा मंत्री नितेश राणे यांचे आवाहन).

विश्वस्त डॉ .राजेंद्र बबनराव खेडेकर यांची भूमिका काय?

डॉ .राजेंद्र बबनराव खेडेकर यांनी पत्रामध्ये मटन विक्रेत्यांसाठी घेतलेला निर्णय चांगला असल्याचं म्हटलं आहे. आपण कोणाकडून मटन खरेदी करत आहोत याची माहिती मिळणार आहे. गोमांस किंवा इतर प्राण्यांच्या मांस विक्रीला आळा बसेल पण त्यासाठीच्या सर्टिफिकेटला दिलेलं मल्हार नाव बदला असं त्यांनी पत्रात म्हटलं आहे. भगवान शंकर यांचा अवतार असलेला जेजुरीचा खंडोबा 'मल्हार' या नावाने देखील ओळखला जातो.

खंडोबा ही शाकाहारी देवता आहे. त्याला मटणाचा नाही तर पुरणपोळीचा नैवेद्य केला जातो. चंपाष्ठलीला देखील गडावर वांग्याचं भरीत-भाकरी नैवेद्य म्हणून दिली जाते. मूळातच खंडोबा ही देवता प्राण्यांवर प्रेम करणारी असल्याने कुत्रे, बैल यांचा त्यांच्यासोबत सहवास असतो. याचा विचार करून झटका मास सर्टिफिकेटला मल्हार नाव देण्याचा निर्णय रद्द करावा आणि नाव बदलावे असे आवाहन करण्यात आले आहे.

जेजुरीच्या खंडोबा देवस्थानच्या विश्वस्तांमध्येही वाद

मीडीया रिपोर्ट्सनुसार, जेजुरीच्या खंडोबा देवस्थानच्या विश्वस्तांमध्येही वाद आहेत. 'मल्हार' नावाचा आक्षेप हा विश्वस्त डॉ. राजेंद्र खेडेकर यांचा वैयक्तिक निर्णय असल्याचं विश्वस्त मंगेश घोणे यांनी सांगितलं आहे. याबाबत श्री मार्तंड देवस्थान समितीचा संबंध नाही. आमच्यात अशी बैठक झाली नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.