महाराष्ट्र विधानसभा निवडणुकी (Maharashtra Assembly Election 2019) साठी आता अवघे काही दिवस शिल्लक असताना, राजकीय प्रचारसभांचे सत्र नॉनस्टॉप सुरु आहे. भाजपाच्या वतीने उद्या देखील राज्यभरात विविध ठिकाणी सभांचे आयोजन करण्यात आले आहे. खास म्हणजे यासाठी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) , उत्तरप्रदेशातील खासदार व अभिनेता रवी किशन (Ravi Kishan) तसेच भाजपाचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा (J. P. Nadda) स्वतः उपस्थित असणार आहेत. या नेते मंडळींच्या उपस्थितीत मुंबई व उपनगर तसेच पुणे,येथे सभा तसेच खास कार्यक्रम पार पडतील.
प्राप्त माहितीनुसार, उद्या संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे संध्याकाळी 5.30 वाजता, पुणे जिल्ह्यातील भोसरी येथे जाहीर सभा घेणार आहेत तर या पाठोपाठ संध्यकाळी 7.30 वाजता वानवडी येथे सिंह यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच अभिनेता रवी किशन हे घाटकोपर येथील, विक्रोळी पार्क मधून दुपारी 12 वाजता रोड शो करणार आहेत या नंतर लगेचच दुपारी 4 वाजता मालाड येथे रोड शो आणि सभा घेऊन , संध्याकाळी 7 वाजता, मागाठाणे येथे तर 8 वाजता मीरा रोड येथे सभा घेण्यात येणार आहे. रवी किशन यांची प्रसिद्धी पाहता रात्री 10 वाजता मीरा भाईंदर येथे बाटी चोखा कार्यक्रम आयोजित करून नागरिकांशी थेट संवाद साधण्याचा पक्षाचा बेत आहे.
दरम्यान, प्रचारसभांच्या निमित्ताने अनेक केंद्रीय मंत्री मंडळी सुद्धा महाराष्ट्र दौरा करत आहेत. याच अंतर्गत सुरुवातीला अमित शहा, पाठोपाठ पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आता राजनाथ सिंह राज्यात सभा घेणार आहेत. तर दुसरीकडे काँग्रेस माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी सुद्धा काल लातूर जिल्ह्यातील औसा येथून प्रचाराचा नारळ फोडला उद्या देखेल राहुल गांधी काही सभांमधून नागरिकांना भेटणार आहेत.