Mahayuti | (Photo credit: archived, edited, representative image)

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 (Maharashtra Assembly Elections 2024) चा प्रचार ऐन भरात आला आहे. अशा वेळी सत्ताधारी महायुती आणि विरोधातील महाविकासआघाडी जोरदार प्रचार करत आहे. मात्र, या वेळी निदर्शनास येणारा महत्त्वाचा घटक म्हणजे, निवडणूक कोणतीही असली तरी नेहमीच आक्रमक प्रचार करणारा भाजप या वेळी कधी नव्हे तो बॅकफूटला जाताना दिसत आहे. महायुतीच्या निवडणूक धोरणातही एकवाक्यता नाही. अजित पवार यांनी तर करमाळा येथे चक्क अपक्ष उमेदवाराला म्हणजेच संजयमामा शिंदे यांना पाठिंबा दिला आहे. दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनीही काहीसे नरमाईचे धोरण स्वीकारल्याचे दिसते. तर भाजप प्रणित भाजपाही महाविकासआघाडीवर फारसे आक्रमक धोरण राबवताना दिसत नाही. खास करुन शरद पवार (Sharad Pawar) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावरील टीका करताना भाजप नेते सबुरीचे धोरण स्वीकारत आहेत.

नरेंद्र मोदी बॅकफूटवर?

भ्रष्टाचार आणि विकास या मुद्द्यावरुन विरोधकांना गारद करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 मध्ये शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याबाबत मात्र विशेष मौन बाळगाताना दिसतात. एकेकाळी भ्राष्टाचाऱ्यांचे शिरोमणी असा शरद पवार यांचा उल्लेख करणाऱ्या पंतप्रधानांनी या वेळी मौन का बरे बाळगले असावे, असा सवाल उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा उल्लेख नकली संतान असा करणारे हेच नरेंद्र मोदी आता त्यांच्यावर टीका करताना आपल्या तोंडाला काहीसा लगाम लावत आहेत. ते काँग्रेसवर येथेच्छ टीका करत आहेत. मात्र, राज्यातील महत्त्वाच्या नेत्यांवर मात्र सोईस्कर मौन बाळगत आहेत. अर्थात ते त्यांच्यावर टीका करत नाहीत, असे नाही. पण नेहमीच्या तुलनेत या टीकेची धार मात्र भरीच कमी आहे. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्येही संभ्रम तयार झाला आहे. (हेही वाचा, Maharashtra Assembly Elections 2024: भाजपमध्ये बट्याबोळ? 'बटेंगे तो कटेंगे' घोषणेवरुन नाराजीची चर्चा; पंकजा मुंडे तर स्पष्टच बोलल्या)

महायुती बॅकफूटवर?

दस्तुरखुद्द नरेंद्र मोदी हेच शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टोकाची टीका करणे टाळत असल्याने महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या शिवसेना, भाजप आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातही काहीसा संभ्रम आहे. त्यातच भाजपच्या काही स्थानिक नेत्यांनी आणि शेतकरी संघटेचे नेते सदाभाऊ खोत, यांच्यासारख्या नेत्यांनी शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेमुळे अजित पवार भलतेच अस्वस्थ झाल्याचे पाहायला मिळाले. त्यांनी सदाभाऊ खोत यांना थेट फोन करुन आणि प्रसारमाध्यमांसमोरही आपली स्पष्ट नाराजी व्यक्त केली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस (SP) हा मित्र दुखावला जाऊ नये, अशी तर भाजपची इच्छा नाही ना? असा तर्क काढला जाऊ लागला आहे.