'बटेंगे तो कटेंगे' (Batenge to Katenge) घोषणेवरुन केवळ महायुतीच नव्हे तर भारतीय जनता पक्षातही मतमतांतरे असल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे महायुती आणि (BJP) भाजप यांच्यात विधानसभा निवडणूक ( (Maharashtra Vidan Sabha Election 2024) ) प्रचारात बट्याबोळ झाला आहे का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे () यांनी नुकतीच एका इंग्रजी वृत्तपत्राला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी या घोषणेबद्दल काहीसी नाराजी व्यक्त करतानाच 'बटेंगे तो कटेंगे' पेक्षा विकासाच्या मुद्द्यावर अधिक बोलायला पाहिजे, अशी भूमिका व्यक्त केली. त्यामुळे राजकीय वर्तुळातही भूवया उंचावल्या जात आहे.
भाजपच्या घोषणेला अजित पवारांचा विरोध
महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक प्रचारासाठी भाजपने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना आणले आहे. जे कट्टर हिंदुत्त्वाचे पुरस्कर्ते आहेत. त्यांनी महाराष्ट्रात आल्याबरोबर जाहीर सभांमधून 'बटेंगे तो कटेंगे', 'एक है तो सेफ' है, अशा घोषणा दिल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील तशीच री ओढली. दरम्यान, महायुतीतील घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस (AP) पक्षाचे नेते अजित पवार यांनी महाराष्ट्रात अशा घोषणा चालत नाहीत. सर्वांनी विकासाच्या मुद्द्यावर बोलायला हवे. असे स्पष्ट मत व्यक्त केले होते. त्यापाठोपाठ आता पंकजा मुंडे यांचेही विधान आल्याने महायुतीमध्येच निवडणूक प्रचारातील मुद्द्यांवरुन चलबिचल सुरु आहे की काय अशी चर्चा आहे. (हेही वाचा, Maharashtra Assembly Elections 2024: मुंबई शहर जिल्ह्यात मतदानाच्या दिवशी दिव्यांग व ज्येष्ठ नागरिक मतदारांसाठी विशेष सुविधा; जाणून घ्या कुठे नोंदवू शकाल तुमच्या मागण्या)
पंकजा मुंडे यांचे भूवया उंचावणारे विधान
पंकजा मुंडे यांना 'बटेंगे तो कटेंगे' मुद्द्यावरुन थेट प्रश्न विचारला असता त्यांनी त्याच तत्परतेने उत्तर दिले. त्यांनी म्हटले की, केवळ भाजपमध्ये आहे म्हणून या घोषणेचे समर्थन करणार नाही. माझं राजकारण वेगळं आहे. सर्वांना सोबत घेऊन जाणे याला मी प्राधान्य देते. इतकेच नव्हे तर अशा मुद्द्यांपेक्षा विकासाच्या मुद्द्यावर अधिक बोलायला हवे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील सर्वांना सोबत घेऊन जात कोणत्याही प्रकारचे जात-धर्म न पाहता सर्वांना समान न्याय दिला आहे. (हेही वाचा: Maharashtra Assembly Elections 2024: 'स्वबळावर निवडणूक लढवा, शरद पवार यांची छायाचित्रे आणि व्हिडिओ वापरू नये'; सर्वोच्च न्यायालयाचे Ajit Pawar गटाला निर्देश)
दरम्यान, महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक प्रचार ऐन भरात आला आहे. महायुती विरुद्ध महाविकासआघाडी असा थेट सामना पाहायला मिळत आहे. महाविकासआघाडीने विकासाच्या मुद्द्यावर लक्ष्य केंद्रीत केले आहे. तर सत्ताधारी महायुतीने हिंदुत्त्वाचा मुद्दा प्रमुख बनवला आहे. त्यामुळेच भाजप नेते 'बटेंगे तो कटेंगे', 'एक है तो सेफ' असा नारा देत आहेत. ज्याचा महाराष्ट्रात वेगळा अर्थ काढला जात आहे. राज्यातील जनता कोणाला स्वीकारते हे लवकरच कळणार आहे.