 
                                                                 Ganeshotsav 2024: महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड (MSEDCL)ने या वर्षीच्या गणेशोत्सवादरम्यान (Ganeshotsav)गणेश मंडळांना तात्पुरती नवीन वीज जोडणी देण्याचे जाहीर केले आहे. ही वीज जोडणी घरगुती दरात आकारली जाणार आहे. त्यामुळे सार्वजनिक गणेश मंडळांनी (Ganesh Mandal)अधिकृत तात्पुरती वीज जोडणी घ्यावी, अशी विनंती महावितरणने केली आहे. सर्व गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी गणेश उत्सवादरम्यान शॉर्ट सर्किट किंवा इलेक्ट्रिकल वायरिंग बिघाडांचे धोके टाळण्यासाठी महावितरणचे कनेक्शन घेण्याचे सांगितले आहे. (हेही वाचा: Ganpati Idol Price Hike: मुसळधार पावसामुळे गणेश मूर्तींच्या किंमतीत 30 टक्क्यांनी वाढ; दरवाढ पाहून नागरिक थक्क)
याशिवाय, आपत्कालीन परिस्थितीत, पुणे परिमंडळाने पुणे आणि पिंपरी चिंचवड शहर तसेच आंबेगाव, जुन्नर, मावळ, खेड, मुळशी, वेल्हे आणि या शहरांसाठी 7875767123 विशेष संपर्क क्रमांक प्रदान केला आहे. याशिवाय नेहमीच्या 1912, 18002123435 किंवा 18002333435 या टोल फ्री क्रमांकांवर संपर्क साधता येईल. गणेश मंडळांनी उत्सवादरम्यान पाऊस पडण्याची शक्यता असल्याने संभाव्य धोके टाळण्यासाठी वीज यंत्रणेची योग्य काळजी घ्यावी. मंडप आणि प्रकाशासाठी विद्युत व्यवस्था आणि सेटअप अधिकृत विद्युत कंत्राटदारांनीच केलेले हवे. गणेश मंडपातील विद्युत यंत्रणेचे अर्थिंग सुस्थितीत असल्याची खात्री करावी असे निर्देश दिले आहेत.
मंडपाच्या आतील तारांचे इन्सुलेशन खराब झाल्यास, अशा तारांमधून विद्युत् प्रवाह धातूच्या पत्र्यात किंवा ओल्या वस्तूंमध्ये जाऊ शकतो. हे टाळण्यासाठी, तारांना योग्य प्रकारे इन्सुलेशन केले पाहिजे किंवा कनेक्शन योग्य इन्सुलेशन टेपने झाकलेले असावे. स्विचबोर्डच्या मागे प्लायवुड किंवा लाकडी बोर्ड ठेवण्याची खात्री करा. कमी दाबाच्या आणि उच्च दाबाच्या वीजवाहिन्या, ट्रान्सफॉर्मर, फीडर पिलर आणि इतर यंत्रणांना गणेशोत्सवाच्या सजावटीमध्ये किंवा मिरवणुकीत स्पर्श होणार नाही, याचीही काळजी घ्यावी.
गणेश मंडळांनी विनापरवाना वीज वापरल्यास 2003 च्या विद्युत कायदा अंतर्गत कारवाई केली जाईल. गणेश उत्सवादरम्यान वीजपुरवठा आणि जनरेटरसाठी स्वतंत्र कनेक्शन असणे आवश्यक आहे. वीजपुरवठा बंद असताना जनरेटर सुरू केल्यास, शेअर्ड न्यूट्रलमुळे जनरेटरमधून विद्युत प्रवाह लो-व्होल्टेज लाइनमध्ये वाहू शकतो, ज्यामुळे जीवघेणा अपघाताचा धोका असतो. सततच्या पावसामुळे आणि जोरदार वाऱ्यामुळे मंडपासह सार्वजनिक ठिकाणी लावलेल्या दिवाबत्तीच्या तारा निखळत नाहीत किंवा विस्कळीत होणार नाहीत याची दैनंदिन तपासणी करावी, अशी विनंतीही महावितरणने केली आहे.
 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     QuickLY
                                                                                QuickLY
                                     Socially
                                                                                Socially
                                     
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     
                     
                     
                                 
                                 
                                 
                                 
                                 
                                
