Mahatransco Recruitment 2021: महाराष्ट्रात उर्जा विभागामध्ये महापारेषण  विभगात होणार 8500 जागांवर नोकरभरती; मंत्री डॉ. नितीन राऊतांची माहिती
Government Employee (Photo Credits: PTI)

महाराष्ट्रामध्ये पोलिस खात्यातील, आरोग्य खात्यातील महाभरती नंतर आता उर्जा विभागामध्ये देखील महापारेषण विभागात (Mahatransco Recruitment) नोकर भरतीची आता घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या अनेक तरूणांसाठी ही मोठी दिलासादायक बाब आहे. राज्याचे उर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी 8500 जागांवर नोकर भरती होणार असल्याची माहिती दिली आहे. IBPS RRB Recruitment 2021: ग्रामीण बॅंकांमध्ये पीओ, क्लार्क पदांवर भरती 28 जून पर्यंत ibps.in वर असा करा ऑनलाईन अर्ज.

न्यूज 18 च्या रिपोर्ट्स नुसार, ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या सूचनेनुसार महापारेषणचे व्यवस्थापकीय संचालक दिनेश वाघमारे यांनी हा पदभरतीचा प्रस्ताव तयार करून सादर केला आहे. मंत्रालयात देखील या विषयावर झालेल्या बैठकीत डॉ. राऊत यांनी ही पदभरती लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश दिल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे मागील काही दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या प्रकरणामुळे थांबलेली नोकरभरती आता हळूहळू पुन्हा सुरळीत होण्याची शक्यता आहे. Maharashtra Health Department Recruitment 2021: महाराष्ट्र आरोग्य विभागात मेगाभरती, 16 हजार पदे भरली जाणार; पाहा सविस्तर.

तांत्रिक संवर्गातील 6750 आणि अभियंता संवर्गातील 1762 पदं अशा एकूण 8500 पदांसाठी उर्जा विभगात महापारेषण मध्ये नोकरभरती करण्याचा संबंधित विभागाचा मानस आहे. याबाबतचे नोटिफिकेशन, सविस्तर परिपत्रक जारी झालेले नाही मात्र लवकरच ते प्रसिद्ध केले जाईल. या नोकरभरतीमध्ये आयटीआय उत्तीर्ण आणि अभियांत्रिकीच्या पदवीधारकांना नोकरीसाठी प्राधान्य दिला जाणार आहे. या नोकरभरतीमुळे अनेक वर्ष रिक्त असलेली पदं भरण्यासाठी देखील पदोन्नतीचा देखील मार्ग मोकळा होणार असल्याने या निर्णयाचं स्वागत केले जात आहे.

महापारेषण मधील नोकरीसाठी उमेदवारांना सातत्याने www.mahatransco.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी लागणार आहे तसेच याकरिता ऑनलाईन अर्ज उपलब्ध होणार आहे. तर लेखी परीक्षेचा टप्पा पार करून उमेदवार निवडले जातील.