प्रभाकर मोरे (Prabhakar More) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षात प्रवेश केला आहे. प्रभाकर मोरे हे विनोदी अभिनेते आहेत. एका खासगी वाहिणीवर सुरु असलेल्या 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasyajatra) या कार्यक्रमातून ते घराघरात पोहोचले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे घड्याळ हाती बांधत त्यांनी आपल्या राजकीय करीअरला सुरुवात केली आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे वरीष्ठ नेते अजित पवार यांच्या हस्ते त्यांचा पक्षप्रवेश पार पडला. पक्षात प्रवेश करताच त्यांच्यावर मोठी जबाबदारीसुद्धा देण्यात आली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुंबई येथील कार्यालयात हा पक्षप्रवेश पार पडला. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आणि इतरही अनेक नेते उपस्थित होते. प्रभाकर मोरे यांच्यावर सांस्कृतिक कोकण विभागाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यामुळे आगामी काळात मोरे यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रभाव कोकणच्या सांस्कृतीक वर्तुळात उमटविण्याचे मोठे आव्हान असणार आहे. (हेही वाचा, अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष का निवडला? कारण घ्या जाणून)
पक्षप्रवेश करताच प्रभाकर मोरे यांनी सांगितले की, राष्ट्रवादी काँग्रेस नेहमीच कलाकारांच्या पाठिशी ठामपणे उभी राहिली आहे. खास करुन कोविड काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कलाकारांसाठी विशेष काम केले. कलाकाराच्या (कोकणातल्या) काही व्यथा, अडचणी आहेत. त्या समस्या सोडविण्यासाठी मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करत असल्याचे प्रभाकर मोरे या वेळी म्हणाले. दरम्यान, रमी खेळ हा भविष्यात व्यसण ठरु शकतो. त्यामुळे यापुढे मी रमी खेळ उपलब्ध करुन देणाऱ्या अॅपची जाहीरात करणार नाही. इतर कलाकारांनीही ती करु नये, असे प्रभाकर मोरे यांनी म्हटले.