अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष का निवडला? कारण घ्या जाणून
Priya Berde | (Photo Credits: Twitter)

चित्रपट निर्मात्या, अभिनेत्री आणि दिग्दर्शक प्रिया बेर्डे (Priya Berde) आज राष्ट्रवादीत (NCP) प्रवेश केला आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या उपस्थितीत पुण्यात मार्केट यार्डातील ‘निसर्ग’ येथील पक्षाच्या कार्यालयात हा प्रवेश झाला आहे. परंतु, प्रिया बेर्डे यांनी राष्ट्रवादी हाच पक्ष का निवडला? याबाबत त्यांनी टीव्ही9 वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले आहे. राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना कलेची जाण आहे, कलाकारांची जाण आहे. त्यांनी कला, नाट्य क्षेत्रात अनेकांना मदतीचा हात दिला आहे, असे प्रिया बेर्डे यांनी सांगितले आहे. महत्वाचे म्हणजे, राज्यपाल नियुक्त 12 जागांमध्ये साहित्यिक, कलाकार, क्रीडा अशा क्षेत्रातील दिग्गजांना संधी देण्यात येते. या निमित्ताने प्रिया बेर्डे यांना ही संधी मिळू शकते का? अशीही चर्चा सध्या सुरु आहे.

आपल्या कलाकारांसाठी मला काम करायचे आहे. राजकारणात प्रवेशासाठी राष्ट्रवादीची निवड का केली, असा प्रश्न मला विचारला जातो. तर शरद पवार साहेबांना कलेची जाण आहे. त्यांना कलाकारांविषयी आदर आहे. त्यांची सांस्कृतिक जाण आम्हा कलाकारांना माहित आहे. लॉकडाऊनच्या काळात लोक कलावंत आणि तंत्रज्ञ यांना मोठी मदत राष्ट्रवादीने केली. राष्ट्रवादी काँग्रेसचेने 3 हजार लोक कलावंतांना प्रत्येकी 3000 रुपये मानधन दिले. नाट्य-चित्रपट क्षेत्रातही अनेक निर्माते दिग्दर्शक यांनी मदत केली आहे, तीही कोणताच गवगवा न करता, असे प्रिया बेर्डे म्हणाल्या आहेत. हे देखील वाचा- अभिनेत्री प्रिया बेर्डे यांचा राजकारण प्रवेश निश्चित, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात महत्त्वाची जबाबदारी

बेर्डे यांच्या समवेत अभिनेते सिद्धेश्वर झाडबुके, अभिनेते विनोद खेडकर, लावणीसम्राज्ञी शकुंतलाताई नगरकर, ज्येष्ठ सिने अभिनेत्री सुहासिनी देशपांडे कार्यकारी निर्माते संतोष साखरे, लेखक दिग्दर्शक अभिनेते डॉक्टर सुधीर निकम, अखिल भारतीय चित्रपट मउहामंडळाचे उपाध्यक्ष मिलिंद अष्टेकर, हे सर्वजण राष्ट्रवादी चित्रपट सांस्कृतिक विभागांमध्ये प्रवेश करणार आहेत, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या चित्रपट व सांस्कृतिक विभागाचे प्रदेश कार्याध्यक्ष बाबा पाटील यांनी दिली होती.