![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2021/01/Cold-in-Maharashtra-380x214.jpg)
दिवाळी संपली की थंडीची चाहूल लागते आणि साधारण तुलसी विवाह झाला की थंडी हळूहळू पसरु लागते. आता ती महाराष्ट्रात पूर्णपणे (Maharashtra Winter Update) पसरली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी नागरिक गुलाबी थंडीचा (Cold Weather) अनुभव घेत आहेत. तर काही ठिकाणी कडाक्याच्या थंडीने हुडहुडी भरली आहे. ग्रामीण भाग आणि डोंगरकपाऱ्यांमध्ये धुके पसरत आहे. काही ठिकाणी पारा निचांकी पोहोचला आहे. महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वर येथे तापमान 10.4 अंशावर गेले आहे. वेण्णालेक परिसरात तर पारा 6 अंशावर पोहोचला आहे. दुसऱ्या बाजुला धुळे जिल्ह्यातही कमी तापमानाची नोंद झाली आहे. धुळ्यात 8.2 अंशावर पाहा पोहोचला आहे. नाशिकमध्ये नागरिक हुडहुले आहेत तर पुण्यातही उबदार कपडे बाहेर निघाले आहेत. त्यामुळे रब्बी पिकांना पोषक असलेली थंडी सध्यातही लक्ष्य वेधून घेते आहे.
दरम्यान, सातारा शहरात तापमान 15 अंशांवर आहे. तर नाशिक जिल्ह्यातही थंडीचे प्रमाण वाढले आहे. नाशिकमध्ये पाऊस रेंगाळला होता. त्यामुळे येथे थंडीही काहीशी उशीरा येईल असा अंदाज होता. पण थंडीने आपली वेळ साधली आहे. पाठीमागील तीन दिवसांत नाशिकचे तापमान 13 अंशांवरुन घसरुन ते 10.4 अंशावर पोहोचले आहे.
वेण्णालेक परिसरातील तापमान 6 अंशावर
महाबळेश्वरातील तापमान घसरले आहे. महाबळेश्वरातील तापमामन तब्बल 11 अंशावर तर वेण्णालेक परिसरातील तापमान 6 अंशावर गेले आहे. तर सातारा शहरातीलही तापमान 15 अंशावर गेले आहे. निफाडमध्ये 8.1 सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.
दरम्यान राज्यातील विविध ठिकाणी थंडीने चांगलीच हुडहीडी भरवली आहे. त्यामुळे जागोजागी शेकोट्या पाहायला मिळत आहे. उबदार कपड्यांच्या बाजारपेठाही सजताना दिसत आहेत.. नागरिकांनी आपल्या वाकळा, स्वेटर, मफलर, कानटोप्या, स्कार्फ, शाली असे उबदार कपडे बाहेर काढले आहेत. थंडीपासून बचाव करण्यासाठी लोक आपले कान आणि डोके कानटोपीने बंद करत आहेत. या सगळ्यात सकाळी मॉर्निंगवॉकला जाणाऱ्यांची संख्या मात्र काहीशी रोडावल्याचे पाहायला मिळत आहे.