Sudhir Mungantiwar | Photo Credits: Twitter/ ANI

शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांच्या महाविकासआघाडी सरकारचे खातेवाटप अखेर आज जाहीर झाले. खातेवाटपाची यादी जाहीर होताच अनेक नेत्यांनी मनासारखं खातं न मिळाल्याने नाराजी व्यक्त केली. अशा परिस्थितीत शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांनी राजीनामा दिला असल्याच्या चर्चांना काल उधाण आले होते. परंतु, अखेर मातोश्रीवरून त्यांची समजूत काढण्यात आली. नाराज असणाऱ्या आमदारांमध्ये अब्दुल सत्तार हे एकमेव नसून काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षातील काही कार्यकर्ते व आमदार देखील नाराज आहेत. या सर्व बाबींवर लक्ष साधत भाजपने मात्र नव्या सरकारवर टीका करण्यास सुरुवात केली आहे.

भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी नुकत्याच केलेल्या एका दाव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

सुधीर मुनगंटीवार म्हणाले, "मतभेदांमुळेच नवं सरकार गडगडणार आहे. सत्तेतल्या नेत्यांना जनतेशी काहीही देणं घेणं नाही." तसेच, गुढी पाडवा हे मराठी नव वर्ष असून त्या दिवशी महाराष्ट्रात नवं सरकार येईल असा दावा देखील त्यांनी केला आहे.

त्यांनी केलेल्या या दाव्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची डोकेदुखी वाढणार तर नाही ना असा प्रश्न उद्भवतो. तसेच या दाव्यावरून असेही दिसून येते की शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी मधल्या नाराज कार्यकर्त्यांना गळाला लावण्याचे प्रयत्न भाजपकडून केले जात आहे.

ऑपरेशन लोटस च्या सवालावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी लावणी स्टाईलने दिला जवाब

दरम्यान, महाविकासआघाडी सरकार तयार झाल्यापासूनच मतभेदांची मालिका सुरू झाली आहे. त्यामुळे, उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री पदी विराजमान झाले असून देखील प्रत्येक निर्णय घेताना त्यांना इतर मंत्र्यांशी चर्चा करावी लागत आहे ज्यामध्ये प्रचंड वेळ जातोय. अशा परिस्थितीत, उद्धव ठाकरे यांना आपली आदेश देण्याची सवय बाजूला ठेवावी लागणार आहे असं देखील राजकीय वर्तुळात बोललं जातंय.