
चारित्र्यावरून संशय घेणाऱ्या पतीची पत्नीने हत्या (Murder) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना पुणे (Pune) येथे घडली आहे. या हत्येला आत्महत्येचे रुप देणाऱ्या पत्नीला पोलिसांनी अटक केली आहे. तसेच तिच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. मृतावर अंतिम संस्कार करीत असताना, त्याच्या मुलीने हे रहस्य घरातील सदस्यांना सांगितले. ज्यानंतर पुणे पोलिसांनी आरोपी पत्नीला बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे.
दीपक सोनार असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. दीपकला दारूचे व्यसन असून त्याचे पत्नी राधिकासोबत नेहमी वाद होत असे. दरम्यान, 12 जुलै रोजी पुन्हा दीपक आणि राधिका यांच्यात वाद झाला. या वादातून राधिकाने दीपकच्या डोक्यात लाकडी दांड्याने प्रहार केला. त्यानंतर दिपकचा गळा आवळून त्याची हत्या केली. त्यानंतर हत्येला आत्महत्येचे वळण देण्यासाठी राधिकाने दिपकचे मृतदेह घराच्या छताला लटकवले. तसेच त्याने फाशी घेतल्याचा बनाव रचला. परंतु, हा संपूर्ण प्रकार दिपकच्या मुलीने पाहिला होता. दिपकवर अंतिम संस्कार करत असताना त्याच्या मुलीने घडलेला सर्व प्रकार नातेवाईकांना सांगितला. ज्यामुळे राधिकाचे पितळ उघडे पडले. हे देखील वाचा- Pune Fire: इंडियन इंस्टिट्युट ऑफ सायन्स एज्युकेशन अॅन्ड रिसर्ज मध्ये आग, अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपक सुरक्षा रक्षकाची नोकरी करायचा. तसेच तो राधिकाच्या चारित्र्यावर संशय करायचा. ज्यामुळे त्यांच्या सतत वाद होत असे. या त्रासाला वैतागून राधिकाने त्याची हत्या केल्याची तिने पोलिसांना सांगितले आहे.