Image For Representations (Photo Credits - PTI)

महाराष्ट्रासह (Maharashtra) विदर्भात (Vidharbh) थंडीची लाट (Cold Wave) पाहायला मिळत आहे. मागील काही आठवड्यांपासून दक्षिण भारतात पाऊस सुरु आहे. तर बर्फवृष्टीमुळे उत्तर भारतात थंडीचा कडाका वाढला आहे. मैदानी भागातून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे महाराष्ट्रातील वातावरणावरही परिणाम होत आहे. विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये किमान तापमान 12 अंश सेल्सिअसच्या खाली घसरले आहे. नाताळनंतर काही दिवस तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. वातावरणामध्ये बदल झाल्याने गेल्या दोन दिवसांपासून राज्यामध्ये थंडी जाणवू लागल्याने नागरिकांनी शेकोट्यांचा आधार घ्यायला सुरुवात केली आहे.

दरम्यान परभणी जिल्ह्यात मागच्या काही दिवसांपासुन थंडीची लाट आल्याने जिल्हा गारठला आहे. सलग दुसऱ्या दिवशी जिल्ह्याचे तापमान 10.08 अंशापर्यंत घसरले असल्याने सर्वत्र गारठा पसरला  आहे. ग्रामीण भागासह शहरातही ठिकठिकाणी शेकोट्या पेटू लागल्या आहेत थंडीपासून बचावासाठी नागरिक उबदार कपड्यांचा वापर करताना दिसून येत आहेत तर महत्त्वाचं म्हणजे रब्बी पिकांसाठी थंडी पोषक आहे.

गेल्या आठवडाभरात राज्यात तापमानात घट झाली असून थंडीचा कडाका वाढला आहे. गेल्या तीन दिवसापासून तापमानात मोठ्या प्रमाणात घट झाली असून तापमान 15 अंश पर्यंत खाली आले आहे. वातावरणातील गारव्याचा फायदा रब्बी हंगामातील पिकांना होणार असून पिकांना पोषक वातावरण निर्माण झाले आहे.