Maharashtra Weather Update: पुढील 48  ते 72 तासात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात मुसळधार पावसाची शक्यता
Rain

जुलै महिन्यात पडल्यानंतर ऑगस्टमध्ये दडी मारलेल्या पावसाने गेल्या 24 तासांत राज्यातील काही भागात हजेरी लावली आहे. काही ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद देखील झाली आहे. कोकण (Kokan),मध्य महाराष्ट्र (Central Maharashtra), मराठवाडा (Marathwada) आणि विदर्भातील (Vidarbha) काही भागात शनिवारी मुसळधार ते मध्यम पाऊस पडल्याची नोंद करण्यात आली. तर पुढील 48 ते 72 तासांत राज्यात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाला येलो अलर्ट (Yellow Alert)देण्यात आलाय.  पावसाच्या या आगमनाने राज्यातील शेतकरी हा सुखावला आहे. (हेही वाचा - Maharashtra Weather Forecast: राज्यात चार दिवस पावसाचा अंदाज, शेतकऱ्यांना दिलासा मिळणार?)

उत्तर बंगाल उपसागराच्या किनाऱ्यावर चक्रीय स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे विदर्भ परिसरात येत्या 48 तासात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे विदर्भ आणि मराठवाड्यात 4 तारखेनंतर जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रातही मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. याचबरोबर संपूर्ण राज्यात मेघगर्जनेसह पाऊस होणार असल्याचा अंदाज आहे. यामुळे या ठिकाणी येलो अलर्ट देण्यात आलाय.

पुणे आणि आसपासच्या परिसरात 2 आणि 3 सप्टेंबरला घाट विभागात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता असून येथे येलो अलर्ट देण्यात आलाय. शनिवारी दिवसभरात कोल्हापूर, रायगड, सांगली, पुणे या जिल्ह्यांत पावसाने हजेरी लावली. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागात मुसळधार पाऊस झाला.