Maharashtra Heat Wave: महाराष्ट्रात मालेगाव मध्ये सर्वाधिक तापमानाची नोंद, तर मुंबई मध्ये सुद्धा उष्णतेचा पारा चढला!
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-ट्वीटर)

Maharashtra Weather Update: मे महिना अर्धा संपत आला असताना आता देशातले तापमान दिवसागणिक वाढत आहे. देशात राजस्थान, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशसह अनेक राज्यात तापमानाने उच्चांक गाठला आहे. बर्‍याच ठिकाणी कमाल तापमान 40 डिग्री सेल्सिअसच्या वर नोंदवले गेले. रविवार 10 मे आणि सोमवार 11 मे हे यंदाच्या उन्हाळयातील आतापर्यंतचे सर्वात उष्ण दिवस ठरले आहेत. महाराष्ट्रात मालेगाव (Malegaon) मध्ये सर्वाधिक तापमान नोंदवले गेले आहे. स्कायमेट वेदरनुसार सोमवारी मालेगाव येथे कमाल तापमान 44.4 अंश सेल्सिअस नोंदले गेले आणि जे महाराष्ट्रातील सर्वात उष्ण ठिकाण ठरले आहे. भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई (Mumbai) मध्येही बरेच उष्ण वातावरण आहे. #Video: पावसाळा तोंडावर असतानाही मुंबईतील मिठी नदी, धारावी भागातील नाल्यांची परिस्थिती दयनीय; किरीट सोमैया यांनी शेअर केलेला व्हिडीओ पहा

प्राप्त माहितीनुसार, महाराष्ट्रात पुणे, नाशिक, अहमदनगर, जळगाव, यवतमाळ, परभणी, नांदेड आणि अहमदनगर या जिल्ह्यात ही अधिक तापमानाची नोंद झाली असून प्रत्येक जिल्ह्यात जवळपास 40 अंश सेल्सिअसवर तापमान आहे. दरम्यान, मध्य प्रदेशात कित्येक ठिकाणी अशाच उष्ण तापमानाची नोंद झाली. शहजापूर येथे 44 अंश सेल्सिअस तर खरगोन येथे 43.6 अंश सेल्सिअस तापमान होते. दरम्यान, महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान मध्ये येत्या दिवसातील तापमान 44 अंशांना स्पर्श करण्याची शक्यता सुद्धा हवामान खात्याने व्यक्त केली आहे.

एकीकडे उन्हाचे प्रमाण वाढत असताना रविवारी, भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) येत्या पाच दिवसात गडगडाटी वादळी वाऱ्यासह महाराष्ट्राच्या काही भागात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. आयएमडी मुंबईचे डायरेक्टर जनरल, के एस होसाळीकर यांनी ट्विट मध्ये सांगितल्याप्रमाणे अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर या शहरांमध्ये येत्या काही दिवसांत वीज आणि वादळी वाऱ्यासहित पाऊस होऊ शकतो. काल सुद्धा अनेक भागात हे पावसाळी वातावरण पाहायला मिळाले.