Monsoon In Mumbai 2020: दरवर्षी जून महिना उजाडण्याच्या आधी मुंबई महापालिकेकडून (BMC) नालेसफाईचे काम केले जाते, तरीही ऐन पावसाळ्यात अनेकदा नाले तुंबून पाणी साचणे, पूर येणे अशा परिस्थिती उद्भवतातच. यंदा तर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊन सुरु असल्याने यातील बरीच कामे अजूनही झालेली नाहीत. दुसरीकडे पावसाळा सुरु होण्यासाठी आता अवघे दोन ते चार आठवडे शिल्लक आहेत त्याआधीही जर ही सफाई झाली नाही तर मुंबईला पावसाळयात मोठ्या संकटाचा सामना करावा लागू शकतो. अशा आशयाचे ट्विट भाजप नेते किरीट सोमैया (Kirit Somaiya) यांनी केले आहे. सोमैया यांनी मुंबईतील मिठी नदी (Mithi River), धारावी (Dharavi) परिसरातील आणि शिवाजीनगर (Shivajinagar) मधील नाले यांची तपासणी केली. या नाल्यात अजूनही कचरा असल्याचे दृश्य दाखवणरा व्हिडीओ सुद्धा त्यांनी शेअर केला आहे.
किरीट सोमैया यांनी मुंबई महापालिकेला टार्गेट करत हे ट्विट केले आहे. "बीएमसीचे नालेसफाईचे काम अजूनही केवळ कागदावरच आहे. कोरोना नंतर पावसात भरलेल्या नाल्यानी मुंबई बुडणार..मी धारावी, शिवाजीनगर, मिठी नद्दी, नाल्याची पाहणी केली" असे त्यांनी या ट्विट मध्ये म्हंटले आहे.
किरीट सोमैया ट्विट
मुंबई महापालिकेची नाले सफाई कागदा वर. कॉरोना नंतर पावसात भरलेल्या नाल्यानी मुंबई बुडणार..मी धारावी, शिवाजीनगर, मिठी नद्दी, नाल्याची पाहणी केली
Mumbai BMC NaleSafai on Paper. I visited Dharavi, Mithi River, ShivajiNagar....Nalas. Mumbai will b flooded in first rain @Dev_Fadnavis pic.twitter.com/0TnwsUNMvT
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) May 10, 2020
दरम्यान, हवामान खात्याच्या अंदाजानुसार येत्या मान्सून हंगामात भारतामध्ये सरासरीच्या 100% पाऊस पडणार आहे. केरळ मध्ये 1 जून पर्यंत पावसाळा सुरु होईल तर मुंबईत 11 जून ते 15 जून च्या दरम्यान पाऊस धडक देईल अशी शक्यता आहे. मागील काही दिवसात महाराष्ट्रातील अनेक भागात अवकाळी पाऊस झाला होता, त्यावेळी सुदैवाने काही समस्या निर्माण झाल्या नाहीत मात्र सलग पावसाळा सुरु झाल्यास स्वच्छता आणि पाणी साचणे हा प्रश्न गंभीर होऊ शकतो.