
Maharashtra Weather Update: राज्यात थंडीने आपला मुक्काम वाढवला आहे. त्यामुळे तिचे आस्तित्व दखलपात्र जाणवू लागले आहे. त्यातच तिचा कडाकाही वाढल्याने (Maharashtra Weather Forecast) नागरिकांना हुडहुडी भरत आहे. तर वन्य प्राणी-पक्षांनाही थंडीपासून बचाव करण्यासाठी नैसर्गिक आदिवासाचा आश्रय घ्यावा लागत आहे. वाढत्या थंडीपासून संरक्षण करण्यासाठी प्राथमिक उपाय म्हणून लोकर आणि उबदार कपड्यांना प्राधान्य दिले जात आहे. तर काही ठिकाणी शेकोट्या पेटवल्या जात आहेत. काही ठिकाणी तर पारा इतका खालावला आहे की, दवबिंदूही गोठले आहेत. राज्यात पुढचे काही दिवस थंडीचा कडाका (Cold In Maharashtra)असाच राहणार असून, पुढे तो हळूहळू कमी होईल आणि मग तापमान वाढत जाऊन उन्हाळ्याची चाहूल लागेल. राज्यात विविध ठिकाणी नोंद झालेले तापमान खालील प्रमाणे:
महाराष्ट्रातील हवामान अंदाज आणि तापमान नोंदीनुसार, बुधवारी सर्वाधिक कमी तापमानाची नोंद वाशिम जिल्ह्यात नोंदवली गेली. या ठिकाणी पारा 5.6 अंश सेल्सिअर इतका नोंदवला गेला. तर पुणे 8.9, नाशिक 9.00 आणि अहिल्यानगर येथे 7.4 अंश सेल्सियस इतक्या तापमानाची नोंद झाली.
हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र
नैऋत्य बंगाल उपसारगारा हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. हे क्षेत्र हळूहळू तामिळनाडू आणि दक्षिण आंध्र प्रदेशाकडे सरकू शकते. तसेच, पुढच्या 24 तासांमध्ये ते आंध्रप्रदेश किनारपट्टीवरुन उत्तरेच्या दिशेने सरकु शकते. परिणामी राज्यातील तापमानात मोठे बदल पाहायला मिळू शकतात, असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला आहे. दरम्यान, राज्यातील हवामान पुढचे पाच दिवस कोरडे राहू शकेल. थंडी अधिक असलेल्या भागांमध्ये हवेमध्ये आर्द्रतेची पातळी अधिक पाहायला मिळेल, असे ही हवामान विभागाने म्हटले आहे. दरम्यान, राज्यातील तापमान पुढच्या दोन दिवसांपासून तीन ते चार डिग्री अंश सेल्सियने वाढायाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. (हेही वाचा, Cold Wave Alert: थंडीचा कडाका वाढला, भारतातील अनेक भागात तापमानात आणखी घट होण्याची शक्यता)
स्वेटर, मफलर, शेकोट्या आणि कानटपोप्या
राज्यात ग्रामिण भागामध्ये थंडीचा कडाका तर वाढला आहेच. पण, मुंबई आणि ठाणे यांसारख्या शहरांमध्येही आता थंडीचा कडाका बऱ्यापैकी वाढल्याचे पाहायला मिळते आहे. हवेत गारवा असून, नागरिकांना पहाटे बोचरी थंडी पाहायला मिळत आहे. त्यामुळे सकाळी फिरायला जाणाऱ्या नागरिकांनी स्वेटर, कानटोप्या, मफलर बाहेर काढले आहेत. तर रहिवाशी संकुलांमध्ये पहारा देणाऱ्या सुरक्षा रक्षकांनी संकुलांच्या प्रवेशद्वारावरच शेकोट्या पेटवल्याचे पाहायला मिळत आहे. सकाळच्या वेळी शाळेत जाणाऱ्या मुलांसाठीही शाळांनी स्वेटर्स अनिवार्य केले आहेत. नागरिक आणि लहान मुलांना थंडी, खोकला यांसारख्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्याची काळजी घ्यावी, असे अवाहन तज्ज्ञ करतात.