Cloudy Weather | Representational Image (Photo Credits: Pixabay)

Maharashtra Weather Alert: गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्रातील वातावरणात मोठा बदल होत आहे. कधी थंडी, तर कधी पाऊस अशा स्वरुपाच्या वातावरणामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. याशिवाय अचानक झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून त्यांची ताराबंळ उडाली आहे. राज्यातील अनेक भागात पावसाने हजेरी लावली आहे. तसेच काही भागात ढगाळ वातावरण कायम आहे. आज मुंबई, ठाणे, कोकणसह मराठवाड्यात ढगाळ वातावरण राहणार आहे. मुंबईतील काही उपनगरात, पुणे, कोकण विभाग आणि मध्य महाराष्ट्रात हलक्या स्वरुपाच्या पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. यासंदर्भात मुंबई हवामान विभागाचे तज्ञ के एस होसाळीकर यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून माहिती दिली आहे.

हिवाळ्यात अचानक झालेल्या पावसामुळे ग्रामीण तसेच शहरी भागात थंडीचे प्रमाण कमी झाले आहे. नागरिकांना थंडीपासून दिलासा मिळाला असला तरी त्यांना पावसाची रिपरिप सहन करावी लागत आहे. हवामान विभागाने 7 ते 9 जानेवारीपर्यंत 12 जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी केला होता. या अलर्टनुसार, औरंगाबाद, सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे, अहमदनगर, नाशिक, धुळे, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड आणि ठाण्यात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला होता. यातील काही जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. तसेच आज काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. (महाराष्ट्र: दिलासादायक! अतिवृष्टीग्रस्तांसाठी मदतीसाठी राज्य सरकारकडून देण्यात येणा-या दुस-या टप्प्यातील 125 कोटी निधी जिल्हा प्रशासनास प्राप्त)

दरम्यान, दक्षिण मध्य अरबी समुद्रापासून मध्य महाराष्ट्रापर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे राज्यात अवकाळी पाऊस पडत असून ढगाळ वातावरण तयार झाले आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, कोकण विभाग आणि मध्य महाराष्ट्रात 9 जानेवारीपर्यंत पावसाळी वातावरण कायम असणार आहे. याशिवाय आज मुंबईतील काही उपनगरांमध्ये हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.