Gulabrao Patil Tests Positive For Coronavirus: मंत्री गुलाबराव पाटील कोविड 19 रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्याने उपचारासाठी रूग्णालयात दाखल
Gulabrao Patil | (Photo Credit: Facebook)

महाविकास आघाडी सरकार मधील अजून एक मंत्री सध्या कोरोनाच्या विळख्यात आहे. जळगावचे पालकमंत्री आणि राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांना कोरोनाची (Coronavirus) लागण झाली आहे. शिवसेनेच्या गुलाबराव पाटील यांनी फेसबूक पोस्ट करत याची माहिती दिली आहे. दरम्यान काल जळगाव महापालिकेमध्ये पहिल्यांदाच शिवसेनेने एकहाती सत्तेमध्ये महापौरपदी त्यांचा उमेदवार विराजमान केल्यानंतर सेलिब्रेशन झाले. जळगावातील या जल्लोषामध्ये गुलाबराव पाटील देखील सहभागी होते. Coronavirus: महाराष्ट्रासह आज मुंबईत कोरोनाच्या रुग्णांची सर्वाधिक वाढ, नागरिकांनो नियमांचे पालन करा.

दरम्यान गुलाबराव पाटील यांनी फेसबूक पोस्टमध्ये.' माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. माझी प्रकृती चांगली असून मी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने कोरोनाला हरवून लवकरच मी आपल्या सेवेत रुजू होईन. माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी व आपली कोरोना चाचणी करून घ्यावी ही विनंती.' असं म्हटलं आहे.

गुलाबराव पाटील यांची फेसबूक पोस्ट

गुलाबराव पाटील फेसबूक पोस्ट

जळगावातील महापौर पदाच्या निवडणूकीमध्ये गुलाबराव पाटील यांच्यासोबत एकनाथ शिंदे यांची राजकीय डावपेच आखत भाजपाचे 27 नगरसेवक फोडले. शिवसेनेच्या जयश्री महाजन यांची महापौरपदी तर कुलभूषण पाटील यांची उपमहापौरपदी वर्णी लागली आहे. Jalgaon Municipal Corporation Election 2021 Result: जळगाव महापालिकेत शिवसेना विजयाचा 'सांगली पॅटर्न', भाजपची सत्ता गेली; गिरीश महाजन यांच्या बालेकिल्ल्याचे बुरुज ढासळले.

आतापर्यंत महाविकास आघाडी सरकारमध्ये 18 कॅबिनेट मंत्री आणि 7 अन्य राज्यमंत्र्यांना कोरोनाची लागण झाली आहे. सुदैवाने सार्‍यांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या राज्यात कोरोना संकटाचा मुकाबला करण्यासाठी लसीकरण मोहिम चालवली जात आहे. यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी कोविड 19 ची लस घेतली आहे.