CM Uddhav Thackeray | (Photo Credits: YouTube)

महाराष्ट्रासह देशात आता डेल्टा प्लस कोविड वेरिएंट मुळे चिंता वाढू शकत असल्याने सरकारने सावधानतेचा पवित्रा घेत राज्याच्या अनलॉक (Maharashtra Unlock) मध्ये बदल केले आहेत. आजच रत्नागिरीमध्ये डेल्टा प्लस कोविड वेरिएंट बाधित एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याने सरकार पुन्हा अ‍ॅक्शन मोड मध्ये आले आहे. संभाव्य तिसरी लाट थोपवण्यासाठी आज अनलॉक नियमावलीमध्ये बदल करण्यात आले आहेत. पूर्वी 5 टप्प्यामध्ये जाहीर करण्यात आलेला अनलॉक आता केवळ लेव्हल 3 पासून पुढे असेल. म्हणजेच लेव्हल 1 आणि 2 तूर्तास रद्द करण्यात आली आहे. या दोन लेव्हल मध्ये निर्बंध अगदीच नगण्य होते. त्यामुळे बेफिकरीतून संक्रमण वाढू नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.

महाराष्ट्रात येत्या सोमवार(28 जून) पासून लेव्हल 1 आणि 2 वर असणारे सारे जिल्हे आपोआपच लेव्हल 3 वर येणार आहेत. आणि या नव्या नियमावलीची अंमलबजावणी करणं बंधनकारक असणार आहे. यामध्ये नियम मोडणार्‍यांवर कडक कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत.

लेव्हल 3 निर्बंधांअंतर्गत काय सुरू राहील काय बंद राहणार?

  • मॉल, थिएटर्स बंद राहणार आहेत तर रेस्टॉरंट दुपारी 4 वाजेपर्यंतच डाईन ईन मध्ये सुरू राहतील. एरवी पार्सल सेवा, होम डिलेव्हरी सुरू राहणार आहे.
  • लग्न सोहळ्यात कमाल 100 आणि हॉलच्या 50% उपस्थितीला परवानगी, अंत्यविधीला केवळ 20 जणांना परवानगी असेल.
  • सामान्य मुंबईकरांसाठी लोकल ट्रेन बंद राहतील. अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी ग्राह्य पास व ओळखपत्राच्या आधारे प्रवास करू शकतात.
  • शनिवार, रविवार सारी दुकानं बंद राहतील.
  • सलून, जिम 50% क्षमतेने आणि नियमावलीनुसार खुली राहतील.

इथे पहा प्रत्येक लेव्हल मधील निर्बंधांची सविस्तर यादी

दरम्यान आज जारी करण्यात आलेल्या नव्या नियमावलीनुसार, राज्यात आता आरटीपीआर टेस्टच्या आधारेच आठवड्याचा पॉझिटीव्हिटी रेट पाहिला जाणार आहे. तसेच वरच्या लेव्हल मध्ये जाण्यासाठी आता जिल्ह्यांचा सलग 2 आठवड्यांचा पॉझिटीव्हिटी रेट पाहून मुभा दिली जाणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी देखील सर्व जिल्हाधिकार्‍यांना संभाव्य तिसर्‍या लाटेचा धोका पाहता सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. निर्बंध शिथिल करण्याची घाई करू नका असे आवाहन देखील त्यांच्याकडून करण्यात आले आहे.