राज्यात कोरोना व्हायरस (Coronavirus) महामारीची दुसरी लाट कमी होत असली तरी आव्हान अद्याप संपले नाही. कोरोनाच्या डेल्टा प्लस या नव्या व्हेरीएंटने (Delta Plus Variant in Maharashtra) डोके वर काढले आहे. वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये या नव्या व्हेरीएंटचे रुग्ण आढळत आहेत. दरम्यान, कोरोनाच्या डेल्टा प्लस (Delta Plus Variant ) या नव्या व्हेरीएंटने संक्रमित असलेल्या पहिला रुग्ण रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यात दगावला आहे. रत्नागिरीचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, डेल्टा प्लस विषाणूने संक्रमित महिला 80 वर्षीय महिला ही संगमेश्वर येथील रहिवासी होती. तिच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या महिलेला इतरही काही आजार होते, अशीही माहिती लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिली. जिल्हाधिकाऱ्यांच्या माहितीला पालकमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनीही दुजोरा दिला आहे.
आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, राज्यात सध्यास्थितीत डोल्टा व्हेरिएंटचे 21 रुग्ण आहेत. याबाबत माहिती देताना राजेश टोपे यांनी जालना येथे बोलताना सांगितले की, राज्यात डेल्टा व्हेरीएंटचे 21 रुग्ण आहेत. त्यापैकी एक रुग्ण दगावल्याची माहिती आहे. असे असले तरी सध्यातरी राज्यात डेल्टा व्हेरीएंटचे रुग्ण खूप मोठ्या प्रमाणावर नाहीत. या व्हेरीएंटची लागण झाल्याचे राज्यात आणखीही काही रुग्ण आहेत का हे तपासण्यासाठी 36 जिल्ह्यांतून नमुने गोळा करण्याचे काम सुरु आहे. या कामात केंद्रीय संस्था NCDC राज्य सरकारला सहकार्य करत आहे. या व्हेरीएंटमुळे राज्यात निर्बंध लावावे अशी सध्या तरी स्थिती दिसत नाही. (हेही वाचा, Fake Vaccination Camp at Hiranandani Estate Society: चारकोप मधील शिवम हॉस्पिटलच्या डॉक्टर दांम्पत्यासह 10 जणांना अटक; Special SIT कडून होणार तपास)
दरम्यान, महाराष्ट्रातील एकूण जिल्ह्यांपैकी 7 जिल्ह्यात डोल्टा प्लस विषाणूचे 21 रुग्ण आढळले आहेत. या व्हेरीएंटच्या शोधासाठी 3,400 नमुने तपासण्यात आले. या नमुन्यांपैकी डेल्टा प्लस व्हेरीएंटची लागण 21 जणांना झाल्याचे पुढे आले. राज्याच्या एकूण रुग्णांच्या तुलनेत हे प्रमाण 0.005% इतके आहे. राज्यात सध्यातरी डेल्टा प्लस प्रकारच्या रुग्णांची गंभीर वाढ झाल्याचे आकडेवारीवरुन तरी दिसत नाही, असे राजेश टोपे म्हणाले.