कोरोना व्हायरस (Coronavirus) संकटाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन (Lockdown) लागू केल्यानंतर प्रदीर्घ काळ लोटला आणि अखेर नवी मुंबई (,Navi Mumbai) शहरातील मॉल्स सुरु झाले. राज्य सरकार आणि केंद्र सरकारने घालून दिलेल्या अटी, नियम आदींचे पालन करुन 5 ऑगस्टपासून हे मॉल्स सुरु करण्यास परवानगी होती. मात्र, नवी मुंबई महापालिका (Navi Mumbai Municipal Corporation) हद्दीतील मॉल्ससाठी ही परवानगी केवळ औटघटकेची ठरली. कारण लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजे 6 ऑगस्टपासून पुढील आदेश येईपर्यंत हे मॉल्स पुन्हा बंद करण्यात आले आहेत. नवी मुंबई महापालिकेतील (NMMC) सूत्रांच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तत म्हटले आहे की, संबंधित मॉल चालकांनी नियम आणि अटींचे पालन केले नाही. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला.
दरम्यान, शहरातील मॉल्स पुन्हा एकदा बंद झाल्याने नवी मुंबई शहरातील नागरिकांमध्ये नाराजीची भावना आहे. नवी मुंबई महापालिकेतील एका अधिकाऱ्यांनी प्रसारमाध्यमाशी बोलताना सांगितले की, मॉल्स व्यवस्थापनाकडून केंद्र सरकार आणि राज्य सरकारने घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन झाले. नवी मुंबई महापालिका अतिरिक्त आयुक्त संजय काकडे यांनी सांगितले की, मॉल्समध्ये सोशल डिस्टन्सींग पाळण्यात आले नाही. त्यामुळे आम्हाला काही काळ हे मॉल बंद ठेवण्याचा निर्णय घ्यावा लागला. आम्ही हे मॉल्स पुन्हा सुरु करण्यासाठी लवकरच विचार करु, असेही काकडे यांनी सांगितले. टाईम्स ऑफ इंडियाने याबाबत वृत्त दिले आहे. (हेही वाचा, Maharashtra Unlock 3: महाराष्ट्रात 5 ऑगस्ट पासून 'मिशन बिगीन अगेन' अंंतर्गत केवळ आऊट डोअर व्यायामप्रकार, खेळांना परवानगी)
दरम्यान, नवी मुंबई महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी सांगितले की, “आमच्या भागात मॉल पुन्हा सुरू करण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र, दिसून आले आहे की बरेच लोक आमच्या कार्यक्षेत्र बाहेरून मॉलमध्ये खरेदीसाठी प्रवास करीत होते. त्यामुळे वाजवीपेक्षा अधिक गर्दी वाढली असती. म्हणूनच, मॉल्स उघडण्याच्या निर्णयाला पुन्हा स्थगिती देण्यात आली. मॉल्स उघडण्यास परवानगी देणे ही अनॉक करण्याच्या प्रक्रियेची एक सुरुवात होती, असेही बांगर या वेळी म्हणाले.