महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यामुळे राज्य सरकारने लॉकडाउन येत्या 30 एप्रिल पर्यंत कायम राहणार असल्याचा निर्णय शनिवारी जाहीर केला आहे. त्यामुळे विविध कार्यक्रम, शाळा, महाविद्यालयांच्या परिक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. याच पार्श्वभुमीवर दहावीचा (SSC Board) शेवटचा म्हणजेच भूगोलाचा (Geography) पेपर रद्द करण्यात आल्याचा निर्णय महाराष्ट्र शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी घेतला आहे. त्यामुळे दहावीच्या विद्यार्थ्यांना मूल्यमापन करुन गुण देण्यात येणार आहेत. तर आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी सुद्धा दहावीचा भूगोलाचा पेपर रद्द करण्यात यावा अशी मागणी केली होती.
दहावी बोर्डाचा भूगोलाचा पेपर 21 मार्चला होणार होता. मात्र कोरोनाच्या पार्श्वभुमीवर तो स्थगित करण्यात आला होता. तर वर्षा गायकवाड यांनी 14 एप्रिल नंतरची राज्यातील कोरोनाची परिस्थिती पाहून भूगोलाचा पेपर ठेवण्यात येईल असे म्हटले होते. मात्र आता राज्यात वेगाने कोरोनाचा फैलाव होत असल्याने 30 एप्रिल पर्यंत लॉकडाउन लागू करण्यात आले आहे. त्यामुळे आता एससी बोर्डाचा भूगोलाचा पेपर रद्द केला आहे. त्याचसोबत नववी आणि अकरावीची परिक्षा होणार नसल्याचा सुद्धा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांची पहिल्या सत्राची परिक्षा झाली होती. पण आता दुसऱ्या सत्राची परिक्षा होणार नाही आहे.(मुंबई: कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता धारावीतील झोपडपट्टीचे 'Protector 600' मशीनद्वारे निर्जंतुकीकरण)
#BREAKING | कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पाहता इयत्ता नववी आणि अकरावीच्या दुसऱ्या सत्रातील परीक्षा रद्द करण्याचा निर्णय तर दहावीच्या भूगोल व कार्यशिक्षण या विषयाचीही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय- शिक्षणमंत्री @VarshaEGaikwad
यांची माहिती pic.twitter.com/4tgGczjnqw
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) April 12, 2020
दरम्यान, राज्यात कोरोना व्हायरसच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी रेड, ऑरेंज आणि ग्रीन अशी त्रिस्तरीय वर्गवारी करण्यात आली आहे. तसेच राज्यातील एकूण कोरोना रुग्णांपैकी 91 टक्के रुग्ण हे मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर, पुणे येथील असून उर्वरित 9 टक्के रुग्ण हे राज्याच्या इतर भागातील आहेत. कोरोनाबाधीत रुग्णांपैकी 70 टक्के रुग्णांना लक्षणे नसून 25 टक्के रुग्णांना सौम्य स्वरूपाची तर 5 टक्के रुग्णांची स्थिती गंभीर असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माहिती दिली आहे.