मरहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 (Maharashtra Assembly Election Results 2024) साठी झालेल्या मतदानाची मतमोजणी सुरु आहे. या मतमोजणीचे प्राथमिक कल हाती येऊ लागले आहेत. हे कल पाहता महायुती (Mahayuti) मोठ्या प्रमाणावर आघाडी घेताना दिसत आहे. तर दुसऱ्या बाजूला महाविकासआघाडी (Maha Vikas Aghadi) प्रचंड पिछाडीवर आहे. हे कल पाहून नागरिकही संशय व्यक्त करु लागले आहेत. शिवसेना (UBT) खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी तर या कलांवरच थेट आक्षेप घेतला आहे. ज्यामुळे उलटसुलट चर्चांना उधान आले आहे. अनेकांचे म्हणने असे की, दोन्ही आघाड्यांमध्ये कोणीही विजयी होवो पराभूत होवो मात्र राज्यातील सत्ताधारी आणि विरोधी पक्ष यांच्यातील जागांचे अंतर कमी असायला हवे.
हा निकाल लावून घेतला- संजय राऊत
विधानसभा निवडणुकीत या आधी अनेकांनी ईव्हीएमवर संशय घेतला आहे. राहुल गांधी, संजय राऊत यांच्यासह काँग्रेस आणि इतरही अनेक राजकीय पक्षांनी ईव्हीएमवर संशय घेतला आहे. शिवसेना (UBT) पक्षाचे नेते संजय राऊत यांनी तर थेट आक्षेप घेत म्हटले आहे की, हा निकाल अनेक संशय निर्माण करणारा आहे. लोकशाही परंपरेत येणारा निकाल आम्ही नेहमीच मान्य केला आहे. मात्र, सध्या जाहीर होत असलेला निकाल पाहता 'कुछ तो गडबड है' असे आम्हाला वाटते. या निकालावर राज्यातील जनतेने तरी कसा विश्वास ठेवावा? असा सवाल विचारताना संजय राऊत म्हणतात या निवडणुकीत मोदी, शहा, अडाणी आणि फडणवीस यांनी काय जादू केली हे शोधायला हवे. या निवडणुकीवर गौतम अडाणी यांचे बारीक लक्ष होते. हा निकाल लागला नाही, तो लाऊन घेतला आहे. असेही राऊत म्हणाले. (हेही वाचा, Maharashtra Assembly Election Results 2024: लोकशाही मानणाऱ्या व्यक्तीला हा निकाल मान्य होऊ शकणार नाही - संजय राऊत)
शरद पवार यांनी या निवडणुकीत मोठे वादळ निर्माण केले होते. असे असताना त्यांच्या पक्षाला 10 जागा देखील महाराष्ट्र देत नाही, असे होऊच शकत नाही. एकनाथ शिंदे यांना इतक्या जागा काहीही झाले तरी मिळू शकत नाही, अशी थेट टीकाही संजय राऊत यांनी केली आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील सामान्य नागरिकांमध्ये या निकाल आणि कलांबाबत उलटसुलट चर्चा आहे. काही नागरिकांनी या निकालाचे समर्थन केले आहे तर काही नागरिकांना सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर जागांचा फरक असू शकत नाही. दरम्यान, ही सर्व चर्चा केवळ कलांवर आधारीत आहे. अद्याप संपूर्ण निकाल जाहीर झाला नाही.