पालघर (Palghar) पोलिसांनी एका 18 वर्षीय तरुणाला ताब्यात घेतले आहे. रागाच्या भरात स्वत:च्या आईची हत्या केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तरुण 18 वर्षांचा आहे. किरकोळ कारणावरुन आईसोबत त्याचे घरगुती भांडण झाले. या भांडणात त्याने आईची गळा आवळून हत्या केली. वसई येथील एका भागात मंगळवारी (21 जुलै) रात्री ही घटना घडली.
वसई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तरुण आणि त्याच्या आईमध्ये कौटुंबीक कारणातून वारंवार भंडणे होत असत. मंगळवारी रात्रीही दोघांमध्ये अशाच प्रकारे कशावरुन तरी भांडण झाले. या भांडणात 18 वर्षीय तरुणाने आपल्या 48 वर्षीय आईचा पठ्ठ्याने गळा दाबला. यात तिचा मृत्यू झाला. आईच्या मृत्यूस जबाबदार धरुन पोलिसांनी या तरुणाला हत्येच्या आरोपाखाली अटक केली आहे.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले. तसेच, मृतदेहही ताब्यात घेऊन तो शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला, अशी माहिती पोलिसांनी दिली.