COVID 19 Testing (Photo Credits: Pixabay)

कोरोना व्हायरसचा (Coronavirus) वाढता धोका लक्षात घेत शिवसेना (Shivsena) खासदार राजन विचारे (Rajan Vichare) यांनी ठाणे (Thane) तुरुंगात तैनात पोलिसांची कोविड 19 (Covid 19) ची तपासणी मोफत करण्याची मागणी केली आहे. यासाठी त्यांनी ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर (Rajesh Narvekar) यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी राज्यातील वेगवेगळ्या जेलमधील कैदी कोरोना पॉझिटीव्ह आढळल्याची बाब अधोरेखित करत पोलिसांच्या सुरक्षेसाठी मोफत तपासणीची मागणी केली आहे.

कोरोना व्हायरसच्या वाढत्या धोक्यात पोलिस आणि त्यांचे कुटुंबिय सुरक्षित राहण्यासाठी आणि कोविड 19 चा प्रसार रोखण्यासाठी तुरुंगात तैनात करण्यात आलेल्या पोलिसांची तपासणी होणे आवश्यक आहे. पोलिसांव्यतिरक्त जेलमधील इतर स्टाफ आणि कोरोना संशयित कैद्यांचीही तपासणी व्हावी अशी मागणीही राजन विचारे यांनी पत्रातून केली आहे. (महाराष्ट्र: गेल्या 24 तासात पोलीस दलातील 87 जणांची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आल्याने आकडा 1758 वर पोहचला)

मागील 24 तासांत महाराष्ट्र पोलिस दलातील 87 कर्मचारी कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे राज्यातील तब्बल 1,758 पोलिस कोरोना बाधित आहेत. त्यापैकी 673 पोलिस कोरोना मुक्त झाले आहेत. तर 18 पोलिसांचा कोरोनाच्या संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. पोलिस दलातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राजन विचारे यांची मागणी स्त्युत्य आहे.

दरम्यान महाराष्ट्रातील कोरोना बाधितांची संख्या 47190 वर पोहचली आहे. त्यापैकी 32209 रुग्णांवर अजून उपचार सुरु असून 13404 रुग्ण कोरोना संसर्गातून पूर्णपणे बरे झाले आहेत. तर 1577 रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. सध्या देशासह राज्यात लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरु आहे. लॉकडाऊनमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यास काही प्रमाणात यश आले असले तरी कोरोनाची साखळी अद्याप तुटलेली नाही.