Maharashtra Police | (File Photo)

देशभरासह महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसागणिक वाढत चालला आहे. त्यामुळे येत्या 31 मे पर्यंत राज्यात लॉकडाउनचे आदेश कायम राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे. लॉकडाउनच्या काळात नागरिकांनी आता घरात थांबून कोरोनाच्या विरोधात लढा देण्यासह घराबाहेर पडताना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कोरोनाबाधितांवर वैद्यकिय कर्मचारी, डॉक्टर्स आणि नर्स यांच्याकडून उपचार करण्यात येत आहे. तसेच पोलीस दलातील कर्मचारी सुद्धा आपले कर्तव्य बजावताना दिसून येत आहे. याच दरम्यान गेल्या 24 तासात 87 पोलीस कर्मचाऱ्यांची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे पोलीस दलातील एकूण 1758 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

पोलीस दलातील 55 वर्षा पेक्षा अधिक वयोगटातील कर्मचारी कोरोनाच्या परिस्थितीत काम करणार नाहीत असा निर्णय घेण्यात आला आहे. आतापर्यंत काही पोलीस कर्मचाऱ्यांनी कोरोनाशी यशस्वी लढा दिला आहे. तर काही जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याच्या घटना सुद्धा समोर आल्या आहेत. पोलीस दलातील कोविड19 च्या कर्मचाऱ्यांचा आकडा दीड हजारांच्या पार गेला असून 673 जणांची प्रकृती सुधारली आहे. तसेच 18 जणांचे कोरोनामुळे निधन झाले आहे.(25 मे पासून देशांतर्गत विमानसेवा सुरु करण्याच्या केंद्राच्या निर्णयाला महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचा लाल कंदील; COVID 19 चा धोका वाढण्याची व्यक्त केली भीती)

महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा आकडा आता 47910 वर पोहचला असून त्यापैकी 1577 जणांचा बळी गेला आहे. तसेच 13404 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्याची रेड, ग्रीन आणि ऑरेंज झोननुसार विभागणी करण्यात आली आहे. तर विविध ठिकाणची कोरोनाची परिस्थिती पाहता लॉकडाउनचे नियम शीथिल करण्यात आले आहेत. राज्यात कोरोनाचा वेग संथ झाला असला तरीही त्याची साखळी अद्याप तुटलेली नसल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. कोरोनाग्रस्तांसाठी महाराष्ट्रातील विविध ठिकाणी कोविड आणि क्वारंटाइन सेंटरची सुद्धा उभारणी करण्यात आली आहे.