Education Minister Varsha Gaikwad (Photo Credits: Twitter)

राज्यात कोरोना व्हायरसच्या रुग्णांचा वेग मंदावला गेला आहे. पण तरीही त्याचा प्रादुर्भाव पुन्हा झपाट्याने वाढू नये यासाठी सातत्याने राज्य सरकारकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. याच दरम्यान, केंद्रीय गृहमंत्रालयाने काही दिवसांपूर्वी शाळा सुरु करण्यासंदर्भात SOP जाहीर केली होती. परंतु प्रत्येक राज्यासह केंद्रशासित प्रदेशाने स्थानिक कोरोनाची परिस्थिती पाहून शाळा पुन्हा सुरु कराव्यात असे स्पष्ट केले होते. मात्र राज्यात अद्याप शाळा बंदच ठेवण्यात आल्या आहेत. पण ऑनलाईन पद्धतीने शिक्षण व्यवस्था सुरुच आहे. याच पार्श्वभुमीवर अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या दिवाळी सणाची सुट्टी मिळणार की नाही असा प्रश्न विद्यार्थ्यांसह शिक्षकांना सुद्धा पडला होता. यावर आता शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी एक मोठे विधान केले आहे.

वर्षा गायकवाड यांनी असे म्हटले आहे की, कोरोनाच्या काळात सध्या ऑनलाईन पद्धतीने शिक्षण सुरु आहे. पण दिवाळी सणाच्या काळात विद्यार्थी आणि शिक्षकांना सुट्टी दिली जाणार आहे. या संबंधितचा निर्णय लवकरच जाहीर केला जाणार असल्याचे ही वर्षा गायकवाड यांनी सांगितले आहे. तसेच अकरावी मध्ये प्रवेश केलेल्या विद्यार्थ्यांसंदर्भात सुद्धा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, महाभिवक्ता आणि संबंधित यंत्रणेसोबत चर्चा करुन निर्णय जाहीर केला जाणार आहे. त्याचसोबत दिवाळीच्या काळात कोणत्याही परीक्षेचे आयोजन करु नये अशा सूचना शिक्षण विभागाकडून दिल्या गेल्या आहेत.(Diwali Bonus: मुंबई महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; दिवाळीत मिळणार 'एवढा' बोनस)

दरम्यान, राज्यातील शाळा गेल्या सात महिन्यांपासून बंद असून ऑनलाइन पद्धतीने विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जात आहे. मात्र, इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांचे शैक्षणिक वर्ष महत्वाचे आहे. यामुळे राज्यात दिवाळीनंतर टप्प्याटप्प्याने शाळा सुरु करण्याचा विचार राज्य सरकार करत आहे, अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली होती. तसेच अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लवकरच बैठक घेणार आहेत. या बैठकीत विद्यार्थी हिताचा निर्णय होईल, असेही त्या म्हणाल्या आहेत.