Fire | Image Used For Representational purpose Only (Photo Credits: Pixabay.com)

राजधानी दिल्ली (New Delhi) येथील महाराष्ट्र सदन (Maharashtra Sadan) इमारतीला आज (26 जुलै) सकाळी आग लागल्याची घटना घडली. शॉर्ट सर्किट झाल्याने ही आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. महाराष्ट्र सदन (Maharashtra Sadan Fire) इमारतीतील राज्यपालांसाठी आरक्षित असलेल्या कक्षाला ही आग लागली. आगीची माहिती मिळताच दिल्ली पोलीस आणि अग्निशमक दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अल्पावधितच आग आटोक्यात आणण्यात यश मिळाले. आगीत कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही. वित्त हानी नेमकी किती झाली याबाबत माहिती मिळू शकली नाही.

महाराष्ट्र सदन हे महाराष्ट्राचे दिल्ली येथील महाराष्ट्र शासनाचे निवासी आयुक्त कार्यालय आहे. निवासी आयुक्त हे कार्यालयाचे प्रशासकीय प्रमुख असतात. हे अधिकारी सचिव दर्जाचे अधिकारी आहेत. या कार्यालयावर थेट मुख्यमंत्री नियंत्रण ठेवतात. केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यातील प्रशासकीय दूवा म्हणून हे कार्यालय काम करते. (हेही वाचा, नागपूर मधील महात्मा गांधी ग्रामीण रोजगार योजनेच्या कमिशनर ऑफिसला लागलेल्या आगीत कंप्युटर, फॉल सिलींगसह फर्निचर जळून खाक)

एएनआय ट्विट

महाराष्ट्र सदन या संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र सदन हे कार्यालय दिल्ली येथील कोपर्निकस मार्गावरील सांगली प्लॉट येथे आहे. या कार्यालयात खासदार समन्वय कक्ष , व्यवस्थापक विभाग (राज्य विश्राम गृह आणि राजशिष्टाचार), संपर्क विभाग (केंद्र-राज्य संपर्क, आंतरराष्ट्रीय सहकार आणि गुंतवणुक जाहिरात), विधी कक्ष, आस्थापना विभाग (प्रशासकीय विभाग) आणि लेखा विभाग इत्यादी विभाग आहेत.