![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2021/03/rain-380x214.jpg)
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार नागपूर (Nagpur), पुणे (Pune) आदी शहरांमध्ये आज (18 मार्च) सकाळपासूनच पावसाने हजेरी लावली. महाराष्ट्रातील इतरही काही भागांमध्ये पावसाची (Maharashtra Rains) हजेरी पाहायला मिळाली. नागपूरमध्ये आज सकाळपासूनच आकाशात ढग दाठून आले. त्यामुळे शहरात एक काळोखी पाहायला मिळत होती. दुसऱ्या बाजूला पुणे शहरातही पावसाच्या सरी बरसल्या. त्यामुळे पुणेकरांची सकाळ आज काहीशी ओलीचिंब झाली. दरम्यान, एका बाजूला पावसाचा आनंद असला तरी दुसऱ्या बाजूला शेतकरी मात्र चिंतेत आहे. त्यामुळे या पावसाचा आनंद संमिश्र स्वरुपाचा असल्याचे पाहायला मिळते.
नागपूर शहरासह जिल्ह्यातील वाडी, दत्तवाडी, हिंगणा, गोंडखैरी परिसरात आज सकाळपासूनच पावसाने हजेरी लावली. महत्त्वाचे म्हणजे हवामान विभगाने वर्तवलेल्या अंदाजापेक्षा काहीसा अधिकच पाऊस पडतो आहे. आकाशात ढगांची दाटी झाल्याने परिसरात काळोखी पसरली आहे. सद्या उकाड्याचे वेध लागले असतानाच गारवा मिळाल्याने नागपूरकर काहीसे सुखावले आहेत. (हेही वाचा, Tips for Farmers: शेतात असताना मेघगर्जना होत असल्यास काय करावे वा करु नये, RMC ने ट्विटद्वारे दिली माहिती)
हवामान विभागाचा अंदाज काय?
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार तळ कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात पावसाची शक्यता आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्यामुळे राज्यातील कराही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. या पावसामुळे कोकणात अंबा, फणस, काजू आदी पिकांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. तर उर्र्वरीत महाराष्ट्रात द्राक्ष, संत्र आणि इतर पिकांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.