Maharashtra Rains: पूरग्रस्तांच्या मदतीसाठी NDRF, Coast Guard, Navy आणि Army Units तैनात; शासनाकडून तात्काळ उपाययोजना सुरू
धोक्याची पातळी | प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

भारतीय हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार कोकण विभागात रायगड, रत्नागिरी, पालघर, ठाणे, या जिल्ह्यांमध्ये पूरपरिस्थती (Flood) निर्माण झाली आहे. तसेच रायगड, ठाणे, रत्नागिरी व कोल्हापूर जिल्ह्यांमधील अनेक नद्या धोका पातळीच्या वर वाहत आहेत. अशा ठिकाणी ठिकाणी एन. डी. आर. एफ. कोस्ट गार्ड, नौदल तसेच सैन्य दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. पूरपरिस्थिती मदत व बचावकार्य करण्यासाठी शासनाकडून तात्काळ उपाययोजना सुरू आहेत, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून प्रसिध्दीस देण्यात आली आहे. तसेच पुणे विभागातील संभाव्य पूरपरिस्थिती लक्षात घेवून सातारा, सांगली व कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये सुध्दा एनडीआरएफच्या तुकड्या तैनात करण्यात येत आहे.

रत्नागिरी जिल्ह्यामध्ये भारतीय हवाई दलाच्या हेलिकॉप्टर मार्फत मदत व बचावकार्य करण्यात येत आहे. महाड, चिपळूण, खेड येथील पूरपरिस्थिती मुळे मुंबई-गोवा हायवे वाहतुकीस बंद करण्यात आलेला असून वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु असून जिल्ह्यातील बहुतांशी नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे. पूरपरिस्थितीमध्ये मदतकार्यासाठी एनडीआरएफ च्या 2 तुकड्या जिल्ह्यात दाखल झाल्या आहेत. एक तुकडी शिरोळ तालुक्यात तर दुसरी तुकडी करवीर तालुक्यात पोहोचली आहे. आयआरबी बोट, गोताखोर सेट, लाईफ जॅकेट, रेस्क्यू रोप आदी अत्याधुनिक साधनांसह प्रत्येकी 25 जवानांची 2 पथके सज्ज झाली आहेत.

जिल्ह्यात मदतकार्य करताना पथकाला कोणतीही अडचण आल्यास प्रशासन पूर्णपणे सहकार्य करेल, असे आश्वासन जिल्हाधिकारी श्री. रेखावार यांनी जवानांना दिले. जिल्ह्यात पावसाच्या पाण्यामुळे बंद करण्यात आलेले रस्ते नागरिकांनी ओलांडू नयेत, बॅरीगेट्स काढण्याचा प्रयत्न करून स्वत:चा व कुटूंबियांचा जीव धोक्यात घालू नये अशा सुचना देण्यात आल्या आहेत. पूर परिस्थितीत नागरिकांच्या स्थलांतरासाठी प्रशासनाच्यावतीने सुरक्षित ठिकाणी निवाऱ्याची आवश्यक ती व्यवस्था करण्यात आली आहे. (हेही वाचा:  रत्नागिरी, रायगड, कोल्हापूर, पालघर जिल्ह्यात पूरस्थिती; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला परिस्थितीचा आढावा, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांना सतर्क राहून बचाव कार्य करण्याचे निर्देश)

दरम्यान, राज्यातील पूर परिस्थितीसंदर्भात आज सायंकाळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची चर्चा झाली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी प्रधानमंत्र्यांना राज्य शासनामार्फत बचाव कार्य कसे सुरू आहे त्याचप्रमाणे कुठल्या उपाययोजना केल्या जात आहेत त्याची माहिती दिली. बचाव आणि मदत कार्यात केंद्र सरकार राज्याला सर्वतोपरी मदत करेल असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले.