Maharashtra Rains: रत्नागिरी, रायगड, कोल्हापूर, पालघर जिल्ह्यात पूरस्थिती; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला परिस्थितीचा आढावा, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांना सतर्क राहून बचाव कार्य करण्याचे निर्देश

राज्यात गेले चार-पाच दिवस मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसामुळे पश्चिम महाराष्ट्र व कोकणातील अनेक नद्यांची पातळी वाढली असून प्रशासनाकडून धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. रत्नागिरी, रायगड जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली असून कोल्हापूरच्या पंचगंगेची पातळी धोक्यापर्यंत पोहोचली आहे.

Maharashtra Rains: रत्नागिरी, रायगड, कोल्हापूर, पालघर जिल्ह्यात पूरस्थिती; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला परिस्थितीचा आढावा, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांना सतर्क राहून बचाव कार्य करण्याचे निर्देश
CM Uddhav Thackeray | (Photo Credits: Twitter)

राज्यात गेले चार-पाच दिवस मुसळधार पाऊस (Heavy Rains) सुरु आहे. या पावसामुळे पश्चिम महाराष्ट्र व कोकणातील अनेक नद्यांची पातळी वाढली असून प्रशासनाकडून धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. रत्नागिरी, रायगड जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली असून कोल्हापूरच्या पंचगंगेची पातळी धोक्यापर्यंत पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत अतिवृष्टीमुळे विशेषतः रत्नागिरी, रायगड जिल्ह्यांत निर्माण झालेल्या पूर परिस्थितीबाबत आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एका तातडीच्या बैठकीत आढावा घेतला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी सर्व यंत्रणांनी पुढील इशारा लक्षात घेऊन सावधपणे व काळजीपूर्वक काम करावे. कोविड रुग्ण असतील त्याठिकाणी पर्यायी व्यवस्था करावी अशा सूचना दिल्या.

हवामान विभागाने पुढील तीन दिवस कोकण किनारपट्टीच्या भागात पावसाचा इशारा सांगितला असून, मुख्यमंत्र्यांनी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा तसेच इतर संबंधित विभागांना सतर्क राहून बचाव कार्य करण्याचे निर्देश दिले आहेत त्याचप्रमाणे नद्यांच्या पातळीत सातत्याने वाढ होत असल्याने या भागात राहणाऱ्या नागरिकांनी खबरदारी बाळगावी तसेच प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे. यावेळी मुख्य सचिवांनी एनडीआरएफच्या तुकड्या, स्थानिक पोलीस व अग्निशमन दलाचे जवान, सागरी तटरक्षक जवान हे स्थानिक नागरिकांची मदत घेऊन काम करीत आहेत अशी माहिती दिली.

यावेळी बैठकीत वाढलेल्या नद्यांच्या पातळीबाबत माहिती देण्यात आली. रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी नदीची धोका पातळी 7 मीटर असून सध्या ती 9 मीटर वरून वाहते आहे. वशिष्टी नदीची धोका पातळी 7 मीटर असून ती 7.8 मीटर वरून वाहते आहे. काजळी नदी धोका पातळीच्या 1.74 मीटर वरून वाहत असून कोदवली, शास्त्री, बावनदी या नद्या धोका पातळीवरून वाहत आहेत. यामुळे खेड, चिपळूण, लांजा, राजापूर, संगमेश्वर या शहरे व परिसरातील गावांमध्ये शासकीय यंत्रणांनी नागरिकांना हलविणे, स्थलांतर करणे व इतर मदत कार्य जोरात सुरु केले आहे.

भातसा धरण परिसरात गेल्या 24 तासांत 336 मिमी पाऊस झाला असून धरण 63 टक्के, तर सूर्या धरण परिसरात 156 मिमी पाऊस झाला असून ते देखील 63 टक्के भरले आहे. बारावी परिसरात देखील 256 मिमी पाऊस झाला त्यामुळे धरण 62 टक्के तर मोरबे धरणही 260 मिमी पाऊस झाल्याने 71 टक्के भरले आहे. रत्नागिरी व कोल्हापूर जिल्ह्यात एनडीआरएफच्या प्रत्येकी दोन अशी एकूण चार पथके रवाना होत आहेत. तर ठाणे येथे तीन व पालघर येथे एक टीम पोहचली आहे.

(The above story first appeared on LatestLY on Jul 22, 2021 07:59 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).