Rain Update | (Image Used For Representational purpose Only | (Photo Credits: Pixabay.com)

राज्यातील पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज आहे. पुढील 24 तासांत कोकण (Kokan) आणि किनारपट्टीला लागून असलेल्या पश्चिम घाट येथे अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसंच मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये अतिमुसळधार पाऊस होणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. पश्चिम किनारपट्टीवर पुढील 2-3 दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यानंतर पावसाचा जोर कमी होत जाईल. आज देखील मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला होता. दरम्यान, उद्याही पावसाचा जोर कायम राहणार असल्याने नागरिकांना सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे.

राज्यात अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी विविध दुर्घटना घडल्या. त्यात अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. रायगड जिल्ह्यामध्ये तळई गावात दरड कोसळून 35 जणांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्याचबरोबर 44 जण ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. (कोल्हापूर: पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ; रेक्स्यू टीमला सहकार्य करण्याचे पालकमंत्र्यांचे आवाहन)

IMD Tweet:

दरम्यान, या संपूर्ण पूरपरिस्थितीचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आढावा घेतला असून बचाव व मदत कार्य वेगाने होत असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तर जखमींवर मोफत उपचार करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसंच पंतप्रधानांनी देखील मृतांच्या नातेवाईकांना 2 लाखांच्या मदत तर जखमींना 50 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.