Maharashtra Rain Forecast: महाराष्ट्रात येत्या 48 तासांत मुसळधार पावसाची शक्यता; जाणून घ्या कोणत्या जिल्ह्यांना मिळाला Yellow Alert
Rain Update | (Image Used For Representational purpose Only | (Photo Credits: Pixabay.com)

सप्ताहाच्या सुरुवातीला पुन्हा एकदा महाराष्ट्रात पावसाचा (Maharashtra Rain) जोर वाढू लागला आहे. हवामान खात्याच्या (IMD)  अंदाजानुसार पुढील काही दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता असून, याबाबत पुढील 48 तास अत्यंत महत्वाचे आहेत. लोकांना आवश्यकतेनुसारच घराबाहेर पडण्याचा सल्ला देण्यात आला आहे. काही भाग वगळता संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे. पश्चिम बंगालच्या आसपास तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता पुढील 48 तासांमध्ये कमी होईल. यामुळे 21 सप्टेंबर ते 23 सप्टेंबर दरम्यान राज्यभरात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता येत्या 48 तासात कमी होऊन ते प-उ/प दिशेने उ ओडीशा, उ छत्तीसगड व उ मध्य प्रदेशकडे पुढच्या 3 दिवसात सरकणार आहे. त्यामुळे 21 ते 23 सप्टेंबर दरम्यान राज्यात पावसात वाढ होणार आहे. 25 सप्टेंबरच्या सुमारास बंगालच्या उपसागरात परत एक नवीन सिस्टिम निर्माण होण्याची शक्यता आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पालघर, माथेरान, रायगड, ठाणे, मुंबई येथे मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. पालघर, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता आहे. राज्यात 22 सप्टेंबरसाठी, कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग, सोलापूर, रत्नागिरी, अहमदनगर, जळगाव जिल्हे वगळता सर्वत्र यलो अलर्ट देण्यात आला आहे.  विदर्भातही अमरावती, गोंदिया, गडचिरोली, यवतमाळ, वाशिम जिल्ह्यात सतर्कतेच इशारा देण्यात आला आहे. गडगडाटासह पावसाची शक्यता असल्याने घराबाहेर पडताना काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

(हेही वाचा: Mumbai Local Train: मुंबई लोकल सर्वांसाठी कधी सुरू होणार? जाणून घ्या काय म्हणतात रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे)

23 सप्टेंबरसाठी यवतमाळ, वाशीम, अकोला, जालना, औरंगाबाद, जळगाव, धुळे, नंदुरबार व पालघरसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे. 24 सप्टेंबर रोजी फक्त बुलढाणा साठी यलो अलर्ट आहे.