Raosaheb Danve | (Photo Credits: Facebook)

मुंबईसह (Mumbai) संपूर्ण महाराष्ट्रात कोरोना विषाणूची (Coronavirus) दुसरी लाट आता ओसरत असल्याचे दिसत आहे. सध्या, कोरोनापासून दररोज बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या नवीन प्रकरणांपेक्षा जास्त आहे. म्हणजेच, एकीकडे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती आहे तर दुसरीकडे सध्या तरी परिस्थिती नियंत्रणात आहे. सध्या मुंबईमध्येही दररोज सरासरी 350-450 नवीन प्रकरणे समोर येत आहेत. कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्या रुग्णांची संख्याही कमी झाली आहे. दुकाने उघडी आहेत, कार्यालये खुली आहेत पण मुंबई लोकल (Mumbai Local) अजून सर्व लोकांसाठी सुरु नाही.

अजूनही मुंबईमधील लोकलबाबत अनेक अटी आहेत. मुंबई लोकल सर्वांसाठी कधी सुरू होईल? या प्रश्नाचे उत्तर केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी मंगळवारी (21 सप्टेंबर) दिले. TV9 मराठीशी बोलताना रावसाहेब दानवे म्हणाले, ‘केंद्र सरकारला सर्वांसाठी मुंबई लोकल ट्रेन सुरू करण्यात कोणतीही अडचण नाही. आम्ही 15 ऑगस्टपासून तशीही परवानगी दिली आहे. कोविडची साथ नियंत्रणात असल्याचे सांगून राज्य सरकारने लोकल सुरू करण्याची पत्राद्वारे विनंती केल्यास आम्ही तात्काळ परवानगी देऊ,' अशाप्रकारे केंद्रीय मंत्र्यांनी चेंडू राज्य सरकारच्या कोर्टात टाकला आहे.

यावरून स्पष्ट झाले आहे की, राज्य सरकारने निर्णय घेतल्यास केंद्र सरकार तातडीने प्रत्येकासाठी मुंबई लोकल ट्रेन सुरू करू शकते. सध्या मुंबई लोकल ट्रेनमध्ये प्रवास करण्यासाठी लसीकरण पूर्ण करणे आवश्यक आहे. यानंतरही फक्त मासिक पास असणाऱ्या लोकांनाच लोकलमध्ये प्रवास करण्याची मुभा आहे. म्हणजेच स्थानिक तिकिटे उपलब्ध नाहीत. जर तुम्हाला आठवड्यातून दोन-तीन दिवस जरी प्रवास करायचा असेल, तर त्यासाठी तुम्हाला मासिक पास काढावा लागेल. (हेही वाचा: राज्यपाल Bhagat Singh Koshyari यांच्या पत्राला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे उत्तर, संसदेचे चार दिवसांचे विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी)

दरम्यान, मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरातील लोक लसीकरणाअभावी मुंबई लोकल ट्रेनमधून प्रवास करू शकत नाहीत. बरेच लोक लसीच्या दुसऱ्या डोसची वाट पाहत आहेत. पुरेशा पुरवठ्याअभावी संथ गतीने सुरू असलेल्या लसीकरणामुळे अद्याप लाखो मुंबईकर दुसऱ्या डोसपासून वंचित आहेत.