Maharashtra Political Crisis: आम्हाला 46 आमदारांचा पाठिंबा, राजीनामा द्यायचा की नाही हा उद्धव ठाकरे यांचा निर्णय- एकनाथ शिंदे
Eknath Shinde vs Uddhav Thackeray | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत. बाळासाहेब यांच्याच विचारांशी समहमत आणि त्याविषयी एकनिष्ठ आहोत. त्याच विचारधारेने पुढे जाणार आहोत. आम्ही सर्वजण सोबत आहोत. आमच्याकडे बहुमतासाठी आवश्यक आहे त्यापेक्षाही अधिकचे संख्याबळ आहे, असा दावा शिवसेना बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shind) यांनी केला आहे. ते एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलत होते. दरम्यान, शिवसेना (Shiv Sena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा का? याबाबत विचारले असता तो निर्णय त्यांनीच (उद्धव ठाकरे) घ्यायचा आहे, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, आम्हाला पाठिंबा देणाऱ्या आमदारांची संख्या मोठी आहे. आम्ही सर्वजण सोबत आहोत. आज सायंकाळी आम्ही एक बैठक घेणार आहोत. या बैठकीत सर्व गोष्टींवर चर्चा करुन पुढचा निर्णय निश्चित करु असेही एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. दरम्यान, दुसऱ्या बाजूला महाविकासआघाडी सरकारमध्येही जोरदार हालचाली सुरु आहेत. महाविकासआघाडी मंत्रिमंडळाची एक बैठक मंत्रालयात पार पडत आहे. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व्हिडिओ कॉन्फरन्सींगद्वारे उपस्थित राहणार असल्याचे वृत्त आहे. (हेही वाचा, Maharashtra Political Crisis: तुकारामाच्या भेटीला आले आणि एकनाथाला घेऊन गेले- छगन भुजबळ)

ट्विट

दरम्यान, आमदारांना जबरदस्तीने सूरतला नेल्याचा आरोप एकनाथ शिंदे यांनी फेटाळून लावला आहे. तसेच, आमदार नितीन शिंदे यांना कोणताही मारहाण केली नाही. त्यांना महाराष्ट्रात सोडण्यासाठी आमचे दोन आमदार, कार्यकर्ते हे स्वत: गेले होते, असा दावाही एकनाथ शिंदे यांनी केला आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे यांची नाराजी नेमकी काय आहे याबाबत त्यांनी अद्यापही स्पष्टता दिली नाही. मात्र त्यांनी शिवसेनेचे आमदार आणि सहकारी पक्षांचे असे मिळून 46 आमदार आपल्यासोपत असल्याचे म्हटले आहे. समर्थक आमदारांची संख्या आणखीही वाढू शकते असा दावाही एकनाथ शिंदे यांनी केला आहे.