गुवाहाटीच्या रॅडिसन ब्लू हॉटेलमध्ये जवळपास 50 शिवसेना आणि अपक्ष आमदारांसह एकनाथ शिंदे (Eknath Shinde) तळ ठोकून आहेत. शिवसेनेने (Shiv Sena) कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीची साथ सोडावी असा त्यांचा प्रस्ताव आहे. या गदारोळामध्ये संजय राऊत (Sanjay Raut) यांनी एक महत्वाचे विधान केले आहे. भाजपने (BJP) आपला शब्द पाळला असता तर शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले असते, असे राऊत म्हणाले आहेत. 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मुख्यमंत्रीपदावरून निर्माण झालेल्या वादानंतर शिवसेनेने भाजपशी युती तोडली होती.
आता खासदार संजय राऊत यांनी शनिवारी एबीपी माझाशी बोलताना सांगितले की, ‘भाजपने अडीच-अडीच वर्षांसाठी दोन्ही पक्षांचे मुख्यमंत्री ठेवण्याचा शब्द पाळला असता, तर शिवसेनेकडून एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले असते. या पदासाठी उद्धव ठाकरेंच्या मनात शिंदे यांचे नाव होते. शिंदे मुख्यमंत्री होऊ शकले नाहीत, कारण भाजप अप्रामाणिक होता आणि आता त्याच भाजपसोबत शिंदे जात आहेत.’
ते म्हणाले, ‘उद्धव ठाकरे हे अडीच वर्षांपूर्वी एका विशिष्ठ परिस्थितीमध्ये मुख्यमंत्री झाले होते. तीन पक्षांचे सरकार आहे. तिन्ही भिन्न विचारांचे पक्ष आहेत त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या नावाशिवाय दुसरे नाव दिसले नाही. परंतु शिवसेना आणि भाजपमध्ये जो काही अडीच वर्षांचा करार होता, तो कायम राहिला असता तर, उद्धव ठाकरे यांच्या ऐवजी विधीमंडळाचे नेते म्हणून एकनाथ शिंदे थेट मुख्यमंत्री झाले असते.’
दरम्यान, शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीने आज उद्धव ठाकरे यांन’ ‘पक्षाशी गद्दारी करणाऱ्यांवर’ कारवाई करण्याचे अधिकार देणारा ठराव संमत केला, पण बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्यावर तातडीने कारवाई करण्याचे टाळले. यासोबतच इतर कोणतीही राजकीय संघटना किंवा गट शिवसेना आणि त्यांचे संस्थापक दिवंगत बाळ ठाकरे यांचे नाव वापरू शकत नाही, असा ठरावही कार्यकारिणीने संमत केला. (हेही वाचा: आम्ही शिवसेनेतच, दिपक केसरकर यांनी व्यक्त केली एकनाथ शिंदे गटाची भूमिका)
‘शिवसेना बाळासाहेब ठाकरेंची आहे आणि हिंदुत्वाची व मराठी अभिमानाची त्यांची उग्र विचारधारा पुढे घेऊन जाण्याचे कार्यकारिणीने ठरवले आहे. शिवसेना या मार्गापासून कधीही हटणार नाही,’ असे राऊत यांनी पत्रकारांना सांगितले. ‘पक्षाचा विश्वासघात करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे सर्व अधिकार शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांना देण्याचा ठराव मंजूर केला आहे.’ असेही ते म्हणाले.