महाराष्ट्र पोलीस दलातील आणखी 137 जणांना कोरोनाची लागण तर 2 जणांचा मृत्यू
Maharashtra Police (Photo Credit: Twitter)

महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा (Coronavirus) विळखा दिवसागणिक आता घट्ट होत चालला आहे. त्यात सध्या राज्यातील विविध ठिकाणी मुसळधार पाऊस पडत असल्याने ही चिंता व्यक्त करण्यात येत आहे. याच दरम्यान, रस्त्यावर गस्त घालणारे पोलीस आपले कर्तव्य ठामपणे बजावताना दिसून येत आहेत. परंतु गेल्या 24 तासात महाराष्ट्रातील आणखी 137 पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली असून 2 जणांचा मृत्यू झाला आहे.(Coronavirus Update: मुंबई, पुणे, सिंधुदुर्ग, कोल्हापूर सह महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यातील कोरोना संक्रमितांची एकूण आकडेवारी; जाणून घ्या एका क्लिकवर)

राज्यातील एकूण 10,163 पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी 1865 अॅक्टिव रुग्ण असून एकूण मृतांचा आकडा 109 वर पोहचल्याची माहिती महाराष्ट्र पोलिसांनी दिली आहे. कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी कोविड वॉरिअर्ससह राज्य सरकार सुद्धा सर्वोतोपरी प्रयत्न करत आहेत. राज्यातील मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह पुण्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून येत आहेत. तर आता 5 ऑगस्टनंतर काही गोष्टी सुरु करण्यास ही राज्य सरकारने परवानगी दिली आहे. परंतु त्यावेळी सुद्धा नियमांचे पालन करणे अनिवार्य आहे.(मुंबई: COVID-19 वरील 32,000 रुपयाचे इंजेक्शन 1 लाख किंमतीला विकणा-या 30 वर्षीय आरोपीला मुंबई पोलिसांनी केले गजाआड)

दरम्यान, राज्यात कालच्या दिवसभरात 10,309 कोरोना विषाणू बाधीत रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे एकूण संक्रमित रुग्णांची संख्या 4,68,265 ऐवढी झाली आहे. तर राज्यात नवीन 6,165 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण 3,05,521 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 1,45,961 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील मृतांचा आकडा 16,476 वर पोहोचला असून राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 65.25 टक्के आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे  यांनी दिली आहे.