Ajit Pawar (Photo Credit ANI)

महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकीय उलथापालथीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल्ल पटेल (NCP Leader Praful Patel) यांनी सोमवारी पुन्हा पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी सुनील तटकरे (Sunil Tatkare) हे पक्षाचे नवे प्रदेशाध्यक्ष (aharashtra NCP President) होणार असल्याची घोषणा केली. जयंत पाटील यांच्या जागी तटकरे ही जबाबदारी स्वीकारतील. पाटील यांना पदावरून हटवल्याची माहिती यावेळी देण्यात आली. याबाबत विधानसभा अध्यक्षांनाही कळविण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.

राष्ट्रवादीचे बंडखोर नेते प्रफुल्ल पटेल यांनी सोमवारी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले की, त्यांनी एकत्रितपणे सुनील तटकरे यांची महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. पक्षात संघटनात्मक बदल करण्याचे अधिकार सुनील तटकरे यांच्याकडे असतील, असेही प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले. यासह अजित पवार यांची राष्ट्रवादीच्या विधीमंडळ नेतेपदी निवड झाली आहे. अनिल भाईदास पाटील यांची महाराष्ट्र विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुख्य सचेतकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

पटेल पुढे म्हणाले की, ‘महाराष्ट्र सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतलेल्या नेत्यांना अपात्र ठरवण्याचा अधिकार कोणालाही नाही.’ यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले, 'महाराष्ट्राच्या भल्यासाठी आम्ही हे निर्णय घेतले आहेत. तसेच आमच्या 9 आमदारांवर कारवाई झाल्याचे मला मीडिया रिपोर्ट्सवरून समजले आहे. या संदर्भात, जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांना अपात्र ठरवण्यासाठी आम्ही महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षांकडे अर्ज पाठवला आहे.' सुनील तटकरे म्हणाले, 'राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी मी स्वीकारली आहे. मी महाराष्ट्रात पक्ष मजबूत करेन. मी पक्षाच्या सर्व नेत्यांना विश्वासात घेतले आहे. मी सर्व आमदार आणि जिल्हा परिषद नेत्यांची बैठकही बोलावली आहे.' (हेही वाचा: तीन महिन्यात सगळा खेळ बदलून टाकेन, गेलेले सर्व आमदार परत येतील; शरद पवारांचा मोठा दावा)

आमदारांच्या अपात्रतेबाबत विचारलेल्या प्रश्नाबाबत पटेल म्हणाले, अपात्रतेचे काम पक्ष किंवा अन्य कोणी करू शकत नाही. हा अधिकार विधानसभेच्या अध्यक्षांकडे असतो. यासह प्रफुल्ल पटेल यांनी पुन्हा एकदा आपण आणि आपला पक्ष शिंदे सरकारसोबत असल्याचा पुनरुच्चार केला.