Maharashtra Monsoo | Representational Image. (Photo Credits: Pixabay)

मान्सून महाराष्ट्रात (Maharashtra Monsoon 2022) दाखल झाला आणि राज्यातील जनतेने आनंदाचा श्वास घेतला. हवामान विभागानेही म्हटले होते की, यंदा मान्सून (Monsoon 2022) दमदार बरसणार आहे. सरासरीपेक्षा अधिक पाऊस कोसळणार आहे. त्यामुळे सरकारी पातळीवरही पूर नियंत्रण, पावसाळी कामे आटोपण्यावर भर दिला होता. अशी सगळी जय्यत तयारी होऊनही आता पावसाची वाट पाहावी लागत आहे. त्यामुळे मान्सून आला, महाराष्ट्रात पोहोचला; पण अद्याप सक्रीय नाही झाला अशीच काहीशी अवस्था पाहायला मिळत आहे. नाही म्हणायला राज्यात काही ठिकाणी पाऊस पडलाही आहे. परंतू, तो सरासरीपेक्षा अजूनही कमीच आहे. त्यामुळे 'पावसा.. पावसा.. ये रे' (Monsoon Rain 2022) असे म्हणायची वेळ आली आहे.

मान्सून आला की महाराष्ट्रात पावसाला वेग येतो. मात्र, जूनच्या पहिल्या पंधरवड्याचा विचार केला असता कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ या चारही विभागांमध्ये पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षाही कमी राहिले आहे. (हेही वाचा, Maharashtra Weather Update: महाराष्ट्रात 21 जूनपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज)

हवामान विभागाने दिलेली आकडेवारी खालीलप्रमाणे (आकडेवारी कालावधी 1 ते 16 जून)

कोकण- 99.4 मिमी (सरासरीपेक्षा ५८ टक्के कमी)

मध्य महाराष्ट्र- 28.03 मिमी (सरासरीपेक्षा ५६ टक्के कमी)

मराठवाडा- 41.14 मिमी (सरासरीपेक्षा ३१ टक्के कमी)

विदर्भ- 16.3 मिमी पावसाची (सरासरीपेक्षा ७१ टक्के कमी)

दरम्यान, हवामान विभागाने म्हटले आहे की, मान्सूनच्या पावसासाठी अनुकुल स्थिती निर्माण झाली आहे. मोठ्या पावसाला आवश्यक असणारे मेडन ज्युलियन ऑस्सिलेशन (एमजेओ) हे ढगांचे क्षेत्र मधल्या काहीकाळात अनुकूल नव्हते. त्यामुळे पावसाचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर कमी होते. आता मात्र स्थिती बदलली असून अनुकुलता वाढली असल्याचे तज्ज्ञांचे म्हणने आहे.

उद्यापासून पावसाचे प्रमाण वाढणार

दरम्यान, राज्यात मान्सूनने ओढ दिली असली तरी आता मान्सून पुन्हा सक्रीय होण्यासाठी अनुकुल स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे त्याचा परिणाम उद्यापासून म्हणजेच 18 जूनपासून जाणवायला सुरुवात होईल, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. राज्यात काही ठिकाणी हजेरी लावण्यास पावासने सुरुवातही केली आहे. यात मुंबई, ठाणे, पालघरसह पुणे, सांगली, वाशिम, यवतमाळ, सिंधुदुर्ग, बुलढाणा या जिल्ह्यांचा समावश आहे.