Rains | File image | (Photo Credits: PTI)

काही दिवसांच्या विश्रांतीनंतर आज पुन्हा पावसाने मुंबईत (Mumbai) हजेरी लावली आहे. मुंबईत आज दिवसभर ढगाळ वातावरण राहणार असून मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तर नागपूर (Nagpur), अमरावती (Amravati), भंडारा (Bhandara), चंद्रपूर (Chandrapur), गोंदिया (Gondia), गडचिरोली (Gadchiroli) आणि यवतमाळ (Yavatmal) यांसारख्या ठिकाणी ढगांचा गडगडाट आणि विजेच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल, अशी माहिती मुंबई हवामान विभागाचे उपमहासंचालक के. एस. होसाळीकर (K. S. Hosalikar) यांनी दिली आहे.

धुळे, लातूर, नांदेड, सोलापूर, बीड या जिल्ह्यांमधील अंतर्गत भागांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्याचबरोबर राज्यातील काही भागांमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह मेघगर्जना आणि विजेचा कडकडाट होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी बाहेर पडताना खबरदारी घ्यावी, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. (Maharashtra Monsoon Update: राज्यात पुढील तीन दिवस जोरदार पावसाची शक्यता, अनेक ठिकाणी Yellow Alert जाहीर)

मराठवाडा, कोकणात देखील 6-7 सप्टेंबर रोजी मुसळधार पावसाचा अंदाज आहे. तर घाट भागांत 7 सप्टेंबर रोजी मुसळधार पाऊस होईल, असे हवामान खात्याने सांगितले आहे. दरम्यान, जुलै महिन्यात मुंबईत मोठा पाऊस झाला. यामुळे पाणी साचणे, वाहतूकीचा खोळंबा, ट्रॅफिक अशा अनेक समस्यांना नागरिकांना सामोरे जावे लागले. काही मुंबईकरांना तर या पावसाने 26 जुलैची आठवण करुन दिली. त्यावेळेस 24 तासांत तब्बल 944mm इतक्या पावसाची नोंद झाली होती.

दरम्यान, 5 ते 8 सप्टेंबर दरम्यान पश्चिम किनारपट्टीवर मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे. तर पुढील 5 दिवसांत तेलंगणा आणि आंध्रप्रदेश मध्येही मान्सून सक्रीय होण्याची शक्यता आहे.