Monsoon Forecast (Photo Credits: ANI)

ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासूनच विश्रांती घेतलेल्या मान्सूनने (Monsoon) पुन्हा जोर धरला आहे. राज्यात मान्सूनसाठी पोषक वातावरण निर्माण झाल्याने मागील काही दिवसांपासून हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होत आहे. पुढील दोन-तीन दिवस ही स्थिती कायम राहणार असल्याचा अंदाज आहे. आजपासून पुढील 4 दिवस राज्यातील विविध ठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस होणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. (Maharashtra Rain Update: राज्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता, वेधशाळेने वर्तवला अंदाज)

मुंबई, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस होणार आहे. हवामान खात्याने मुंबईसह, पुणे, ठाणे, पालघर, नाशिक, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर आणि सातारा या नऊ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे, अशी माहिती के. एस. होसाळीकर यांनी ट्विटच्या माध्यमातून दिली आहे. त्याचबरोबर 30-40 किमी प्रति तास वेगाने वारे वाहणार असल्याचंही हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे.

K S Hosalikar Tweet:

सांगली, सोलापूर, लातूर, उस्मानाबाद, बीड, नांदेड, हिंगोली आणि परभणी या आठ जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. विजांचा कडकडातही होणार असल्याने विज कोसळण्याचा धोका आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, आज सकाळपासून मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे.