महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसागणिक वाढत चालला आहे. त्यामुळे लॉकडाउनचे आदेश पुढील काही दिवस कायम राहणार असल्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. तर लॉकडाउनच्या काळात फक्त अत्यावश्यक सेवासुविधा सुरु राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र लॉकडाउनमुळे हातावर पोट असणाऱ्या स्थलांतरिक कामगार आणि मजूर वर्गाला याचा मोठा फटका बसला आहे. त्यामुळे या कामगार वर्गाने याआधी पायी चालत जाण्याचा निर्धार केला. परंतु राज्य सरकारने स्थलांतरित कामगारांना राज्य सोडून जाऊ नये असे आवाहन केले होते. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्रालयाने रेल्वे प्रशासनाला आदेश देत स्थलांतरित कामगार वर्गाला आपल्या राज्यात पाठवण्यासाठी श्रमिक स्पेशल ट्रेनची सोय करुन दिली आहे. याच दरम्यान, आता मुंबईतील समता नगर पोलीस स्थानकात स्थलांतरित कामगारांनी आपल्या घरी जाता येण्यासाठी अर्ज दाखल करण्यासाठी रांगा लावल्याचे दिसून आले आहे.
राज्यातील लॉकडाउनमुळे अडकलेल्या स्थलांतरित कामागारांना आपल्या घरी परत जाता यावे यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. मात्र स्थलांतरित कामगारांना राज्य सोडून जाण्यापूर्वी फिटनेस सर्टिफिकेट आणि रजिस्ट्रेशन करणे अनिवार्य असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. याच कारणास्तव मुंबईत विविध ठिकाणी अडकलेल्या मजूर वर्गाकडून रजिस्ट्रेशन अर्ज दाखल करण्यात येत आहे. श्रमिक स्पेशल ट्रेनच्या आतापर्यंत 222 गाड्या सोडण्यात आल्या असून त्याचा जवळजवळ लाखो कामगार वर्गाने लाभ घेतल्याची माहिती केंद्राकडून देण्यात आली होती.(स्थलांतरित मजुरांना आपल्या गावी परतण्यासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे अतिरिक्त रेल्वे गाड्यांची मागणी करावी- चंद्रकांत पाटील)
Maharashtra: Migrant workers were seen queuing up outside Samta Nagar Police Station in Mumbai for submitting their applications to return to their home states, earlier today. #lockdown pic.twitter.com/SK9NOxUUZu
— ANI (@ANI) May 9, 2020
दरम्यान, महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा 19 हजारांच्या पार गेला आहे. त्यामुळे नागरिकांनी सद्यची परिस्थिती आता तरी गांभीर्याने घ्यावी अशी अपेक्षा केली जात आहे. तर येत्या 10 ते 17 मे पर्यंत लॉकडाउनच्या नियमाचे अधिक कठोरपणे पालन करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात कोरोनाचा वेग संथ करण्यास यश आले असून अद्याप कोरोनाची साखळी तुटली नसल्याचे म्हटले आहे.