
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे गेल्या दीड महिन्यापासून दारुची दुकाने बंद होती. परंतु, 15 मे पासून घरपोच दारुची सोय सुरु करुन मद्यप्रेमींना सरकारने दिलासा दिला आहे. मात्र ठाणे जिल्ह्यातील वेगवेगळ्या पालिका हद्दीत दारुच्या होम डिलिव्हरीची परवानगी अधिकृतरित्या शनिवारी (16 मे) सकाळी जारी करण्यात आली. कोविड 19 च्या लॉकडाऊन काळात घेण्यात आलेल्या या निर्णयातून कन्टेंमेंट झोन वगळ्यात आला आहे. त्यामुळे कन्टेंमेंट झोनमध्ये दारुसेवा घरपोच मिळणार नाही.
ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी शुक्रवारी (15 मे) संध्याकाळी दारुच्या ऑनलाईन विक्री आणि होम डिलिव्हरी संबधित आदेश जारी केला. या आदेशानुसार, दारुची ऑनलाईन विक्री आणि घरपोच सेवा ही जिल्ह्यातील विविध पालिका हद्दीमध्ये देण्यात येणार असून यातून कन्टेंमेंट झोन वगळण्यात आला आहे. विशेष म्हणजे जिह्लाधिकाऱ्यांनी जारी केलेल्या या आदेशात देशी दारुला परवानगी देण्यात आलेली नाही.
होम डिलिव्हरीच्या ऑडर्स या सोशल मीडिया पोर्टलद्वारे देता येतील. तसंच दारु विक्रेत्यांना सर्व नियमांचे पालन करणे आवश्यक असून नियमांचे उल्लंघन केल्यास दंड आकारण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी नार्वेकर यांनी सांगितले. (Liquor Home Delivery in Maharashtra: पुणे, नागपुर सह नॉन कंटेन्मेंट झोन मधील दुकानातून 'या' अटींवर आजपासून घरपोच दारू विक्रीला सुरूवात!)
महाराष्ट्र राज्यात ऑनलाईन दारु विक्रीला परवानगी मिळाली असून काही अटी आणि नियम लागू करण्यात आले आहेत. यात दारुच्या दुकानात 10 पेक्षा अधिक डिलिव्हरी बॉय काम करु शकत नाहीत. तसंच एका डिलिव्हरी बॉयला 24 पेक्षा अधिक बॉटल्स नेण्यास परवानगी नाकारण्यात आली आहे. विशेष म्हणजे सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळणं बंधनकारक असणार आहे.