महाराष्ट्रात (Maharashtra) सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण मुंबई (Mumbai) आणि पुणे (Pune) शहरात आढळून आले आहेत. मात्र, मुंबईने कोरोनामुक्त होण्याच्या दिशेने वाटचाल सुरु केली आहे. तर, पुण्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत आणखी वाढ होताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना पत्र लिहले आहे. मुंबईत सातत्याने कमी चाचण्यांमुळे मृत्यूदर वाढतो आहे. शिवाय, संसर्गाचे प्रमाण सुद्धा चिंताजनक आहे. त्यामुळे तातडीने चाचण्यांच्या संख्येवरील मर्यादा हटवून मोठ्या प्रमाणात चाचण्या करण्याची गरज आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी पत्रात नमूद केले आहे.
मुंबईत 23 जुलै 2020 पर्यंत 4 लाख 62 हजार 221 चाचण्या करण्यात आल्या आहेत. तर, 23 जुलैपर्यंत पुण्यात 3 लाख 54 हजार 729 चाचण्या झाल्या आहेत. मुंबईत 17 ते 23 जुलै या दरम्यान 41 हजार 376 चाचण्या झाल्या आहेत. मात्र, याच कालावधीतील पुण्यात 85 हजार 139 इतक्या कोरोनाच्या चाचण्या झाल्या आहेत. याचाच अर्थ मुंबईपेक्षा दुप्पट चाचण्या पुण्यात झाल्या आहेत, असे देवेंद्र फडणवीस पत्रातून म्हटले आहेत. हे देखील वाचा- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या सुरक्षा रक्षकास कोरोना व्हायरस संसर्ग
एएनआयचे ट्वीट-
Maharashtra Leader of Opposition & BJP leader, Devendra Fadnavis writes to State Chief Minister Uddhav Thackeray saying, "COVID-19 testing in Mumbai should be increased. In the absence of aggressive testing, there is a threat of a bigger spread."
— ANI (@ANI) July 25, 2020
पुण्यापेक्षा कितीतरी अधिक लोकसंख्या असलेल्या मुंबईतील चाचण्या अतिशय कमी होत आहेत. मुंबईत 1 ते 23 जुलै दरम्यान 1 लाख 28 हजार 969 चाचण्या झाल्या आहेत. या 23 दिवसांची सरासरी काढली तरी ती 5 हजार 607 इतकी येते. मुंबईत कमी चाचण्या करणे हे मुंबईकरांच्या जिवाशी खेळण्यासारखे होईल. याचा थेट परिणाम हा मृत्यूदरावर होतो आहे. पुण्याचा मृत्यूदर 2.39 टक्के असून, मुंबईचा मृत्यूदर हा 5.60 टक्के झाला आहे. महाराष्ट्राचा मृत्यूदर हा 3.68 टक्के आहे. मुंबईचा मृत्यूदर आटोक्यात न येण्याचे एकमात्र कारण हे कमी संख्येने होणार्या चाचण्या आहेत, असेही फडणवीस यांनी म्हटले आहे.